महाअपडेट टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. 21 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने भाजपला घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे.
परंतु महाविकास आघाडीसाठी धक्कादायक बातमी म्हणजे काँग्रेसचे जतमधील आमदार जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्याकडून 5 मतांनी पराभव झाला आहे.
भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख राहुल महाडिक आणि सत्यजित देशमुख, यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेतील भाजपचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला.
त्या – आधी आमदार अनिल बाबर, महेंद्र लाड, मानसिंगराव नाईक हे महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनेलमधून यांची बिनविरोध निवड झाली होती. यानंतर जिल्हा बँकेचे रविवारी 18 जागांवर मतदान पार पडले होते.
मागील निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली होती. राज्यात शिवसेना, राष्टवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी एकत्रित सत्ता स्थापन केल्याने राजकारणाची समीकरणे बदलली. या तीन पक्षांनी यंदा एकत्रित निवडणूक लढवल्याने भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.