गांजाची शेती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोलापूरच्या शेतकऱ्याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. गांजाची झाडे आणि त्याच्या पानांच्या आधारे तो गांजा आहे, असा दावा करून अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा दाखल करता येणार नसल्याचा दावा मान्य करून न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी अटकेत असलेल्या आरोपीची 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर सुटका केली.
मोहोळ तालुक्यातील शेतकरी हनुमंत शिंदे याच्या शेतात धाड टाकून पोलिसांनी 65 किलो वजनाची गांजाची झाडे व 850 ग्रॅम वजनाची गांजाच्या झाडाची पाने जप्त केली व त्याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून जुलै 2021 मध्ये अटक केली .
या प्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अज न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीच्या वतीने ॲड. धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता . त्या अर्जावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्यासमोर सुनावणी झाली.
यावेळी ॲड. सुतार यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यालाच जोरदार आक्षेप घेतला. पोलिसांनी शिंदे यांच्या शेतातून गांजाची झाडे जात केली. या झाडांना लागलेल्या मातीसह गाजांचे वजन मोठ्या प्रमाणात दाखवून अटक केली.
गांजाच्या व्याख्येत झाडाचे पाने माती व रोपे येत नाही. तर या झाडाची फळे आणि फुले यांचा समावेश होतो. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना अटकच बेकायदा असाल्याचा दावा करून जामीन देण्याची विनंती केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी हनुमंत शिंदे यांना जामीन मंजूर केला.