संपूर्ण महाराष्ट्रभरात तसेच जालना ते औरंगाबाद महामार्गावर रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी सफरचंदासह गावरान मेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ विक्रीला येत असल्याचे दिसून येत आहे. जालना औरंगाबाद जिल्ह्यात यंदा सीताफळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या भागात गावरान सीताफळासह विकसित केलेल्या सीताफळाच्या बालानगरसह, गोल्डन सीताफळ इत्यादी जातींची सर्वाधिक लागवड झाली आहे.
यंदाच्या हंगामात सीताफळाचे प्रतिएकरी 3 ते 4 टनांपर्यंत उत्पादन होत आहे व त्यातच या फळाला मागणी देखील चांगली असल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातून तब्बल 60 रूपये प्रति किलो दराने खरेदी करीत आहे त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले आहेत असचं म्हणता येईल.
सीताफळाची लागवड करताना प्रतिएकर 400 झाडे अशी लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात सहा ते सात वर्ष वयाच्या झाडांचे प्रति एकरी 4-5 टन उत्पादन होत असल्याने सीताफळ उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. सरत्या पावसाळ्याच्या दिवसांत म्हणजेच सुगीमध्ये गावरान मेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळाचा हंगाम असतो.
हे आहेत पोषक घटक :-
सीताफळातून शरीराला विविध पोषक घटक मिळतात यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन बी -6 , शिवाय पोटॅशियम , मॅग्नेशिअम , फॉफ्सरस सोडीयम , लोह आणि फायबर्सही असतात. सीताफळाच्या सेवनातून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते कमजोर हाडे , स्नायूंवर काम करण्यासाठी तसेच शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि दृष्टीदोषातही सीताफळ फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे सौंदर्य केस आणि त्वचाविकारासाठी सीताफळ लाभदायक ठरते. असे चविष्ट व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले गावरान सीताफळाचे जालना औरंगाबाद महामार्गावर ठिकठिकाणी विक्रीचे स्टॉल थाटली आहेत.
सीताफळाची लागवड ही मुरमाड व हलक्या माळरानात देखील करता येते. तसेच अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांनीही सीताफळाची लागवड करून मोठं-मोठ्या बागा उभारल्या आहेत. त्यामुळे गावरान सीताफळासह बालानगर, सुपर गोल्डन आदी विविध जातींच्या सीताफळाची लागवडी करण्यात आली आहे.
बाजारात सफरचंद 100 रुपयांस दोन किलो, तर सीताफळ 100 ते 120 रुपये प्रतिकिलो असल्यामुळे आता सफरचंदापेक्षा सीताफळाची चव महाग झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
गावरान सीताफळाला तोडीस तोड असे गोल्डन सीताफळही बाजारात दाखल झाले आहे. गावरान सीताफळापेक्षा थोडे पांढरे दिसणाऱ्या या फळाची गोडी वाखाण्याजोगी आहे.
या सीताफळाच्या रंगरूपावरून प्रत्येकजण हे गावरान सीताफळ नसल्याचे ओळखतो. हे सीताफळही कच्चे व पिकलेले अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध असून, विशेषतः फळविक्रेते शहरात हातगाड्यांवर याची विक्री करताना दिसत आहेत .
सुपर गोल्डन सीताफळ ह्या वाणांचे फळ हे दिसायला आकर्षक व मोठे असून या फळांत बिया कमी असतात या फळांत गर जास्त प्रमाणात असतो. या वाणाचे फळ निर्यात करण्यास उपयुक्त आहे. या सीताफळाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात उत्पन्न मिळण्याची संधी आहे .शेतकऱ्यांनी या वाणाला प्राधान्य दिले पाहिजे.
गावरान सीताफळात बालानगर (निवड) टीपी 7 व धारवाड 6 हे वाण आहेत या वाणाला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना याच वाणाची शिफारस केली जाते हे वाण अधिक उत्पन्न देणारे आहे.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
13/11/2022 | ||||||
श्रीरामपूर | — | क्विंटल | 15 | 1000 | 2500 | 1700 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 632 | 1000 | 7000 | 3000 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 676 | 3000 | 5000 | 4000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 5 | 3000 | 3000 | 3000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 50 | 5000 | 8000 | 7250 |
कामठी | लोकल | क्विंटल | 1 | 3000 | 4000 | 3500 |