राज्यातील गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांची भरती नव्या वर्षात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पुन्हा केली जाणार आहे.पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अखेर शासन निर्णय निर्गमित करून पवित्र पोर्टलमार्फतच शिक्षकांची भरती होणार असल्याचे नियोजन केले.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगार शिक्षकांना आता रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, तसेच अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळणार आहे.
तसेच शिक्षणसवकपदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षणसेवकाची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे.
अशाप्रकारे नवीन तरतुदीचा समावेश केल्यामुळे शिक्षक भरती पारदर्शक होणार असल्यामुळे शिक्षक आघाडीच्या डॉ. कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके, अनिल शिवणकर, प्रदीप बिबटे, संदीप उरकुडे यांनी शासनाचे आभार मानले.
पहा पात्रता अन् अटी. . .
उमेदवारास बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य :-
पाच वेळा परीक्षेच्या संधीऐवजी उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
उमेदवाराचे पूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल.
2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवारांचे वय कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षांसाठी शिथिलक्षम करण्यात आले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील.
या चाचणीच्या माध्यमाचा निवडप्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
दर तीन महिन्यांतून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती देण्यात येतील. प्राधान्यक्रमानुसार शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापन निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.