अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक इच्छुकांनी त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. जिल्ह्यांतील अनेक मोठ्या गावांचा या निवडणुकीत समावेश असल्याने इच्छुक उमेदवार आतापासूनच आपली उमेदवारी पक्की धरुन कामाला लागले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील गटातटाच्या मनोमिलनावर होणार आहेत. पक्ष कोणताही असो, प्रत्येक गावात सोयीस्कर युती होणार, मात्र तालुक्याला नेता कोणत्यातरी राजकीय पक्षाचा प्रमुख असणार आहे हे नक्की.
पक्षीय चौकटीत राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेत्यांचा आदेश शिरसावंद्य मानून काम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील नेते मंडळींनी अनेक विकासकामांच्या उद्घाटनांच्या अनुषंगाने गावागावातील कार्यकर्त्याबरोबर थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), बाळासाहेबांची शिवसेना, मनसेबरोबरच आरपीआयचे सर्व गट व छोटे पक्ष, स्थानिक आघाडीतील नेते यांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू दिवस जसे पुढे सरकतील व मतदानाचे टप्पे पुढे जातील तसे तसे वातावरण निर्माण होणार आहे एक मात्र निश्चित यावेळी कुठेही एकतर्फी लढती होणार नाहीत तर सर्वत्र काटा लढती झाल्याच्या पहायला मिळणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील सर्वाधिक 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका संगमनेर तालुक्यात होणार आहेत. तर नगर – 28, कोपरगाव – 26 पारनेर -16, अकोले – 11, नेवासे – 13, पाथर्डी – 11, शेवगाव -12, राहाता -12, राहुरी – 11 श्रीगोंदा – 10, कर्जत – 8, श्रीरामपूर -6, जामखेड – 2
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, बनपिंप्री, बेलवंडी बु., घोगरगाव, पारगाव सुद्रिक, माठ, चवरसांगवी, तांदळी दुमाला थिटेसांगवी, तरडगव्हाण या 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरु होणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पहा..
काष्टी :- ओबीसी प्रवर्ग
बेलवंडी बु. :- सर्वसाधारण प्रवर्ग
बनपिंप्री :- ओबीसी प्रवर्ग
घोगरगाव, :-अनुसूचित जाती महिला प्रवर्ग
पारगाव सुद्रिक :- सर्वसाधारण महिला
माठ :- अनुसूचित जमाती व्यक्ती
चवरसांगवी :- सर्वसाधारण महिला
तांदळी दुमाला :- सर्वसाधारण व्यक्ती
थिटेसांगवी :- सर्वसाधारण महिला
तरडगव्हाण :- ओबीसी महिला
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचातीसाठी जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये भोर तालुक्यातील सर्वाधिक 54, वेल्हे तालुक्यातील 28, इंदापुर – 26, खेड- 23 , आंबेगाव – 21, जुन्नर -17 , बारामती -13, मुळशी – 11 , मावळा – 8 दौंड 8, हवेली -7 आणि शिरूरमधील 4 अशा 12 तालुक्यांमधील 221 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, सोनेसांगवी, कारंजावणे, काठापूर खुर्द या 4 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरु होणार आहे.
पहा निवडणुकांच्या तारखा. . .
तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख :- 18 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची तारीख :- 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
अर्जाची छाननी होणारी तारीख :- 05 डिसेंबर
अर्ज मागे घेण्याची तारीख : 7 डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटपाची तारीख : 7 डिसेंबर दुपारी 3 नंतर…
मतदानाची तारीख : 18 डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : 20 डिसेंबर
निकालाची अधिसूचना : 23 डिसेंबर