बारामती – फलटण – लोणंद रेल्वेमार्गाच्या कामाचा श्रीगणेशा! 63Km अंतरात हे असणार 8 स्टेशन्स, पहा Route Map..
फलटण – बारामती या गेल्या 28 वर्षांपासून रखडलेल्या 1300 कोटी रुपये खर्चाच्या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले असून लगेचच या कामाची सुरुवात होणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद (गुजरात) येथील शानदार सोहाळ्यात देशातील 760 ठिकाणच्या सुमारे 206 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पाच लोकार्पण, भूमिपूजन, उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आले.
आगामी काळात फलटण रेल्वे जंक्शन होणार असून येथून उत्तर प्रदेशात दिल्ली पर्यंत, तसेच पुणे, मुंबई, सातारा, कराड, कोल्हापूर, पंढरपूर वगैरे मार्गावर प्रवासी व माल वाहतूक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.
फलटण बारामती रेल्वे मार्ग सुरु झाल्यानंतर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे अंतर सुमारे 75 कि. मी. कमी होणार असल्याने वेळ, इंधन बचत होणार आहे.
या आधी पुणे – सोलापूर जिल्हा प्रशासनाने महिनाभरात थेट खरेदीद्वारे 131 हेक्टर जमीन संपादित केली असून बारामती – फलटण – लोणंद आणि पुणे – मिरज रेल्वे मार्गासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. या संपूर्ण रेल्वे मार्गापैकी एकूण 37.20 किमी रेल्वेमार्ग एकट्या बारामती तालुक्यातून आहे.
बारामती – फलटण – लोणंद हा 63.65 किमी लांबीचा रेल्वे मार्ग असून त्यातील 37.20 किमी बारामती तालुक्यातून जातो.
बारामती तालुक्यातील लट्टे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगलवाडी, बऱ्हाणपूर, नेटपतवळण, सोनकसवाडी, ढाकळे, थोपटेवाडी, कर्हवागज, सावंतवाडी आणि तांदुळवाडी ही गावे रेल्वे ट्रॅक प्रकल्पाला जोडली जाणार आहे.
वेळ व अंतराची होणार बचत..
सध्या बंगळूर मार्गावर जाण्यासाठी पुणे ते लोणंद व दौंड ते पुणे असे तब्बल 166 किलोमीटर अंतर पार करावे लागते. बारामती- फलटण- लोणंद रेल्वे मार्ग झाल्यानंतर हेच अंतर 104 किलोमीटर इतके कमी होईल. याचाच अर्थ 62 किलोमीटर अंतर कमी होऊन वेळ, इंधन यांची बचत होईल. इंजिनची दिशा बदलण्याची गरज भासणार नाही..
कसा असणार रेल्वे मार्ग ?
चार मोठे पूल, 26 मेजर पूल, 23 मायनर पूल व 7 आरओबी असतील.
नीरा व कऱ्हा नदी, नीरा डावा कालव्यावर पूल उभारले जातील.
न्यू बारामती, माळवाडी व ढाकाळे अशी तीन रेल्वे स्थानके या मार्गावर नव्याने उभारली जातील.
पहिल्या टप्प्यात एकेरी रेल्वेमार्ग टाकला जाईल. तो विद्युतीकरणासह सुरू होईल.