सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या मार्ग क्रमांक – 1 ने गेल्या दहा वर्षांपासून सेवा सुरू केलेली नाही. मात्र, आता या मार्गातील सर्व अडचणी संपल्या आहेत. सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकादरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांनी बुधवारी CMRS प्रमाणपत्र जारी केलं आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी बेलापूर ते पेंढार दरम्यान ट्रायल केल्यानंतर प्रवाशांसाठी खुला करण्याची माहिती दिली आहे. CMRS प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनिल डिग्गीकर यांनी मार्ग क्रमांक 1 च्या मेट्रो स्ट्रेशन्सना भेटी दिल्या. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वाढविण्यासाठी सिडकोतर्फे चार एलिव्हेटेड मेट्रो मार्ग विकसित केले जात आहेत. यापैकी बेलापूर ते पेंढार हे काम सर्वप्रथम सुरू करण्यात आले.
हा मार्ग सुरू करण्यासाठी सिडकोने महा मेट्रोची नियुक्ती केली आहे. सिडकोच्या मेट्रो मार्ग क्रमांक -1 चे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोला आयसीआयसीआय (ICICI) बँकेकडून 500 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा झाला आहे. तसेच सिडकोच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पासाठी समर्पित जमीन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये पेंढार ते सेंट्रल पार्क या 5 स्थानकांदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी CMRS प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. आता मार्ग क्रमांक – 1 वरील पेंढार ते बेलापूर स्टेशन्स दरम्यान सेवा सुरू करण्यासाठी CMRS प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. लवकरच हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित होणार आहे.
बेलापूर ते पेंढार पर्यंत मेट्रो..
नवी मुंबई मेट्रोने एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याची माहिती डिग्गीकर यांनी दिली. CMRS प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नवी मुंबईकरांसाठी बेलापूर ते पेंढार मार्गावर लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अनेक अडथळे पार केल्यानंतर बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. सिडकोने 2011 मध्ये नवी मुंबई शहरात वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी मेट्रो पेंढार ते बेलापूरचा पहिला टप्पा सुरू केला होता.
परंतु, नवी मुंबई मेट्रो विविध कारणांमुळे उशिराने धावत आहे. हे काम पूर्ण करून चालवण्यासाठी सिडकोच्या वतीने महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. मेट्रो सुरू करण्यासाठी सुरक्षा आयुक्तांनीही तीन महिन्यांची मुदत दिली होती, मात्र विविध कारणांमुळे सिडकोला ती सुरू करता आली नाही. आता बेलापूरपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर बेलापूर ते पेंढारपर्यंत मेट्रो धावणार आहे.
महामेट्रो करणार फेज -1 चे संचालन..
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सिडको नवी मुंबई मेट्रो अंतर्गत 4 एलिव्हेटेड मार्ग विकसित करत आहे. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा बेलापूर ते पेंढार अंदाजे 11.1 किमी अंतरावर असून, तळोजा येथे 11 स्टेशन्स आणि एक कार डेपो आहे. बेलापूर ते पेंढार या फेज -1 च्या ऑपरेशनचे कंत्राट महा मेट्रोला देण्यात आले होते.
कमाल भाडे असणार 40 रुपये..
नवी मुंबई मेट्रो – 1 मध्ये प्रवासादरम्यान 2 किमीसाठी 10 रुपये भाडे मोजावे लागणार आहे, तर 2 ते 4 किमीसाठी 15 रुपये, 4 ते 6 किमीसाठी 20 रुपये, 6 ते 8 किमीसाठी 20 रुपये भाडे आहे. 25, 8 ते 10 किमीसाठी 30 रुपये आणि 10 किमीपेक्षा अधिकसाठी 40 रुपये..
स्टेशन्स :-
लाईन – 1 (मार्गवाहक)
बेलापूर – पेंढार (11.10 किमी)
CBD बेलापूर स्टेशन (येथून सुरु)
सेक्टर 7 स्टेशन
सिडको सायन्स पार्क स्टेशन
उत्सव चौक स्टेशन
सेक्टर 11 स्टेशन
सेक्टर 14 स्टेशन
सेंट्रल पार्क स्टेशन
पेठपाडा स्टेशन
सेक्टर 34 स्टेशन
पंचानंद स्टेशन
पेंढर स्टेशन (येथे समाप्त)
तळोजा आगार
कर्मचारी भरतीही लवकरच..
सिडकोने नवी मुंबई मेट्रो लाईन 1 च्या यशस्वी परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे. CMRS प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी मार्ग क्र. 1 वरील मेट्रो स्थानकांना भेट दिली.