महापालिकेतील भरतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्याच्या परीक्षा लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच महापालिकेतर्फे तिसऱ्या टप्प्याची भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने अभियंता पदासाठी आहे. जुलैअखेरपर्यंत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली.
महापालिकांमधील भरतीवर राज्य सरकारने लादलेली बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदा पुणे महापालिकेने भरती सुरू केली. यात विविध 448 पदांची भरती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
यासाठी परीक्षांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. महापालिका प्रशासनाने भरतीच्या तिसऱ्या टण्याची तयारी सुरू केली आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले, कनिष्ठ अभियंता पदाच्या 150 जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येईल. साधारण जुलैअखेर यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
या भरतीच्या वेळी समाविष्ट गावे आणि थेट कार्यकारी अभियंता या पदावर भरतीसाठी आकृतिबंधात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचेही विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर लगेचच भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
या भरतीत कनिष्ठ अभियंता वर्गाची 150 आणि कार्यकारी अभियंता पदाच्या 9 ते 10 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेत नवी गावे समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायतींचे काही कर्मचारी महापालिकेकडे वर्ग झाले आहेत; परंतु त्यामुळे महापालिकेच्या आकृतिबंधात बदल करून अभियंत्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.
यासोबतच महापालिकेकडे नगर अभियंतापद तसेच अधीक्षक अभियंता पदापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेले उमेदवार त्यांचा सेवेतील उर्वरित कार्यकाल लक्षात घेऊन भविष्यात अनेक वरिष्ठ पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.