शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी पैशामुळे घरात झालेल्या किरकोळ भांडणातून पत्नीने रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतल्याने वाचवायला गेलेल्या पतीसह पत्नीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
परंतु या भांडणात 3 वर्षांचा चिमुकला त्याच्या डोळ्यासमोरच अनाथ झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सगळीकडं हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे.
सविस्तर माहिती अशी की, भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा निवासी महेंद्र सिंगाडे हा ग्राम टाकेपार येथील ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटर ऑपरेट या पदावर कंत्राटी कर्मचारी होता. रोज लागलेल्या दारूच्या व्यसनाने महेंद्रला आर्थिक तंगीने घेरल्याने अनेकांची उधारी महेंद्रने केली होती. या पैशामुळे देणेकरी घरी पैसे मागायला येत असल्याने पत्नी मेघाला आवडत नसे. यामुळे त्यांच्यात रोज खटके उडत होते.
शनिवारी रात्रीही 9.30 च्या दरम्यान पती-पत्नी यांचे भांडण झालं. हे भांडण इतके विकोपाले गेले की, मेघाने आपल्या अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतले. हे पाहताच पती महेंद्रने वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु यामध्ये दोघांचाही होरपळून मृत्यू झाला.
मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजारीच राहणारे लहान भाऊ अणि आई -वडील धावून आले मात्र तोपर्यंत दोघे जळीत अवस्थेत दारात मृत पडून होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून या दोघांचा तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे.