शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : परळीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची, बाभळीच्या झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी तेलगाव येथे घडली आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण डिझायर गाडीने भोकर येथून बीडला जात असताना, तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या बाभळीच्या झाडाला स्विफ्ट डिझायर गाडीची (क्रमांक MH-13 CK 0441) जोरात धडक बसून हा अपघात झाला.
या अपघातात सचिन भोसले, युसूफ शेख हे दोघे ठार झाले आहेत. तर अमोल वाघमारे हा युवक मागच्या सिटवर व समोरच्या सिटमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हा अपघात एवढा भिषण व ह्रदयद्रावक होता की, मयत व जखमींना तेलगाव येथील नागरिकांनी व पोलीस कर्मचारी यांनी जेसीबीच्या (JCB) साहाय्याने बाहेर काढले.
गावालगतच अपघात झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येथ नव्हते.
त्यामुळे गॅस वेल्डिंगने वेल्डिंग करून, एका मृतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मृतास जेसीबीच्या सहायाने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले. यानंतर मृत व जखमींना 108 रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत गाडीतील मृत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे एका जखमी तरूणाचा जीव वाचला.