BREAKING : नवा शासन निर्णय जारी ; ZP आरोग्य विभागाच्या 10 हजार 127 पदांच्या 15,16 ऑक्टोबरच्या परीक्षेबाबत मोठं अपडेट…
शेतीशिवार टीम : 20 सप्टेंबर 2022 :- 2019 मध्ये राज्यात होऊ घातलेली बहुचर्चित – बहुप्रतीक्षित आणि बहुविवादित अशी पदभरती म्हणजे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाची पदभरती. याच पदभरतीच्या परीक्षेचे नव्या वेळापत्रका – संदर्भातील शासन निर्णय 26 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. परंतु आता पुन्हा एकदा याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील येणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट – क परीक्षा पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या असून या पद भरतीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाची पदभरती करणाऱ्या तरुण – तरुणींचा भ्रमनिरास झाला आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज : 19 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
याआधी 26 ऑगस्ट 2022 रोजी रोजी एक परिपत्रक काढून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाच्या गट-क संवर्गातील जी पदे आहेत अशा 5 संवर्गातील पद भरतीसाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आलं होतं.
परंतु, आता सरकारने या पद भरतीबाबत एक शुद्धिपत्रक काढून स्थगिती दिली आहे. याबाबत त्यांनी कारणही जाहीर केलं आहे. सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून स्थगिती देण्यात आली आहे असं सांगण्यात आलं आहे. याबाबत एक शुध्दीपत्रक काढलं असून ते काय आहे आपण पाहूया…
सामान्य प्रशासन विभागाच्या दि .4 मे, 2022 च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार मार्च, 2019 व माहे ऑगस्ट, 2021 ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (वेळापत्रक) संदर्भाधीन दि. 26 ऑगस्ट, 2022 च्या शासन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आला होता.
दि. 16 सप्टेंबर, रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडे झालेल्या बैठकीतील झालेल्या चर्चेनुसार असे निदर्शनास आले आहे की, राज्यातील सर्व रिक्त पदांची तात्काळ पदभरती करता यावी यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागातर्फे त्यांच्या दि. 4 मे, 2022 च्या शासन निर्णयातील सूचनांसंदर्भात नव्याने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना / निर्देश शासन निर्णयाद्वारे जाहीर होणार आहेत.
तसेच, सदर परिक्षेच्या कालबद्ध कार्यक्रम (वेळापत्रक) नुसार परिक्षेचे आयोजन दि. 15 व 16 ऑक्टोबर, 2022 या दिवशी करण्यात आले होते.
सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून, सदर परीक्षेची तारीख सुधारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन शुद्धीपत्रक : –
उपरोक्त नमूद पार्श्वभूमीवर मार्च 2019 व माहे ऑगस्ट, 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत संदर्भ क्र. 4 वरील दि. 26 ऑगस्ट, 2022 च्या शासन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमास (वेळापत्रक) स्थगिती देण्यात येत आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या पदभरतीबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना / निर्देश प्राप्त झाल्यानंतर याबाबत यथावकाश कळविण्यात येईल….