राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीज बिलांपोटी खंडित करू नये, तसेच नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तत्काळ बदलून द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या 17 दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या 7138 पैकी 6516 रोहित्र केवळ 48 ते 72 तासांच्या कालावधीत बदलण्यात आली आहेत.
गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले केवळ 622 नादुरुस्त रोहित्र बदलणे शिल्लक असून तीदेखील तत्काळ बदलण्यात येत आहेत. तर महावितरणकडे सद्यस्थितीत तब्बल 4 हजार 18 रोहित्र बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत .
29 नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेली 6 हजार 92 व त्यानंतर 17 डिसेंबरपर्यंत नादुरुस्त झालेली 6 हजार 516 अशी एकूण 12 हजार 608 नादुरुस्त रोहित्र महावितरणकडून युद्धपातळीवर बदलण्यात आली आहेत.
कृषीपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणचे राज्यभरात एकूण 7 लाख 54 हजार वितरण रोहित्र आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे 3 हजार ते 3 हजार 500 रोहित्र दररोज बदलणे शिल्लक राहत होती .
तथापि यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेल रोहित्र तत्काळ बदलून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कृती आराखड्याद्वारे सूक्ष्म नियोजन करून व बैठकीद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलण्याची सक्त सूचना केली.
या नंबरवर करा कॉल..
नादुरुस्त किंवा जळालेल्या वितरण रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने राज्यभरात 1934 कंत्राटदार एजन्सींची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत 11 हजार 632 रोहित्र दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहेत. नादुरुस्त झालेली रोहित्र बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ऑइलसह तब्बल 4 हजार 18 रोहित्र सद्यस्थितीत अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.
ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरू असलेल्या 18002123435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे .