शिवप्रेमींसाठी खुशखबर ! राज्याची राजधानी मुंबई ते छत्रपतींची राजधानी रायगड जलमार्गाने जोडली जाणार, असा जोडला जाणार जलमार्ग, पहा..
मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी किल्ले रायगड लवकरच जलमार्गाने जोडले जाणार आहे. या दोन्ही राजधान्या अगदी 3 ते 4 तासांच्या अंतराने जोडल्या जाणार आहेत.
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून काशीद समुद्रापर्यंत बोटसेवा सुरू केली जाणार आहे. तेथून थेट बसमार्गाने रायगडपर्यंत पोहोचता येणार आहे. पर्यटन विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून येत्या वर्षभरात ही जलसेवा सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. रायगड हा इतिहासाचा एक साक्षीदार असून अनेक पर्यटक, शिवप्रेमी या किल्ल्याला भेटी देत असतात. हा किल्ला पर्यटक तसेच शिवप्रेमींना नेहमीच खुणावत असतो. रस्ते मार्गे या किल्ल्यावर जाण्यासाठी 6 ते 7 तास लागतात.
मात्र, जास्तीत जास्त पर्यटक, शिवप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अगदी कमीत कमी वेळेत पोहोचता यावे तसेच त्यांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभाग जलमार्ग हा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देणार आहे. जलमार्गाद्वारे पर्यटकांना एकप्रकारे समुद्र पर्यटनाचा आनंदही घेता येणार आहे.
संभाजीराजे छत्रपती आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत मुंबई ते रायगड किल्ला समुद्रमार्गे जोडण्यावर अंतिम स्वरूप देण्यात आले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथून रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रापर्यंत बोटसेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी कोचिन येथील एका शिपयार्ड कंपनीला बोट बनवण्याचे काम देण्यात येणार आहे. ही कंपनी 100 प्रवासी क्षमता असलेली बोट बनवणार आहे. येत्या वर्षभरात म्हणजेच पुढील वर्षअखेरपर्यंत हा जलमार्ग सुरू करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
काशीद येथून एसटी किंवा एमटीडीसी बसेसचा पर्याय :-
गेटवे ऑफ इंडिया येथून काशीद समुद्रापर्यंत बोटसेवा सुरू केली जाणार आहे. मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून काशीद येथे जेट्टी बांधण्यात येणार आहे . काशीद ते किल्ले रायगड 35 किमी अंतर आहे.
काशीद येथून किल्ले रायगड येथे पोहोचण्यासाठी एसटी, एमटीडीसी किंवा खासगी बसेस यांचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासंदर्भात लवकरच संबंधितांशी बोलणी करण्यात येणार आहे, असेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
छत्रपती संभाजीराजे आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात बैठक..
छत्रपती संभाजीराजे आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात झालेल्या बैठकीत जलमार्गाबरोबरच किल्ल्यांच्या संवर्धनावरही चर्चा झाली. किल्ले रायगडसाठी जलमार्गाचा पर्याय यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्यात रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांत असलेले समुद्री किल्ले पाहण्यासाठी जलमार्ग विकसित करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
हा निर्णय अमलात आल्यास पर्यटकांना किल्ल्यांची योग्य माहिती माहिती मिळावी, यासाठी खास गाईड नेमण्यात येणार असून ऑडियो रेकॉर्ड, व्हिज्युअल्सद्वारे किल्ल्यांचा इतिहास सांगितला जाणार आहे.