Take a fresh look at your lifestyle.

देशातील पहिली बुलेट ट्रेन नेमकी कधी धावणार ? चक्क समुद्रात आहे 21Km चा बोगदा, 1.08 लाख कोटींपेक्षा जास्त खर्च, पहा रूट मॅप अन् डिटेल्स…

Bullet Train : देशात बुलेट ट्रेन आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी 21 Km लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या आहेत.

यापैकी 7 Km चा मार्ग समुद्राखाली असेल. समुद्राखाली बुलेट ट्रेनचा वेग 300 Km प्रतितास असणार आहे. सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे की, महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या कामाला वेग आला आहे. यासाठी यापूर्वी मागविण्यात आलेल्या निविदा रद्द करून नव्याने निविदा मागविण्यात येत आहेत.

या मार्गावरून जाणार आहे बुलेट ट्रेन :-

बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येत असलेल्या या प्रोजेक्टचे मुख्य आकर्षण मानला जाणारा हा बोगदा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वांद्रे कॉम्प्लेक्स ते शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान बांधण्यात येणार आहे.

समुद्राखालील बोगदा जमिनीपासून 25 ते 65 मीटर खाली असेल. शिळफाटाजवळील पारसिक टेकडीच्या खाली सर्वाधिक खोली 114 मीटर असणार आहे.

टेंडर डॉक्यूमेंट नुसार हा बोगदा टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून बांधण्यात येणार आहे.

देशात प्रथमच समुद्राखाली बांधण्यात येणार आहे बोगदा :-

विशेष म्हणजे बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणारा ठाणे खाडीतील हा सात किलोमीटर लांबीचा समुद्राखालचा बोगदा हा देशातील पहिला बोगदा असणार आहे. टेंडर नुसार या बोगद्याचे काम 1888 दिवसांत पूर्ण करावे लागणार असून या बोगद्यात 300 Km प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.

पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेनचा मार्ग 508.17 Km लांबीचा असून तो महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघरमधून जाणार आहे. ते गुजरातमधील वलसाड, नवसारी, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, खेडा आणि अहमदाबादमधून जाईल.

गुजरातमध्ये 98.8%, दादरा आणि नगर हवेलीमध्ये 100% आणि महाराष्ट्रात 75.25% जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामाच्या प्रगतीबाबत सांगायचे तर, 162 Km च्या पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे, तर 79.2 Km च्या पिअरचे कामही पूर्ण झाले आहे. याशिवाय साबरमती येथील पॅसेंजर टर्मिनल हबचे कामही पूर्णत्वाकडे आहे. बुलेट ट्रेन या मार्गावरील एकूण 508 Km अंतर सरासरी 2 तासांत कापणार आहे.

जुनं टेंडर केलं आहे रद्द…

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये NHSRCL ने या प्रोजेक्टसाठी भूमिगत बोगद्याच्या कामासाठी (Underground Tunnelling Work) निविदा मागवल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी ‘प्रशासकीय कारणे’ सांगून त्या रद्द केल्या.

NHSRCL ने 2019 मध्ये या प्रकल्पासाठी पहिल्यांदा निविदा मागवल्या होत्या, परंतु एकाही बोलीदाराने रस दाखवला नसल्याने नंतर, बुलेट ट्रेनशी संबंधित या प्रोजेक्टसाठी नोव्हेंबर 2021 मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली.

*** या मार्गांवर बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे सर्वेक्षण सुरू….

1. वाराणसी-हावडा (अंदाजे 760 Km)

2. मुंबई-नागपूर (सुमारे 753 Km)

3. दिल्ली-अहमदाबाद (सुमारे 875Km)

4. चेन्नई-म्हैसूर (सुमारे 435 Km)

5. दिल्ली-अमृतसर (सुमारे 459 Km)

6. मुंबई-हैदराबाद (अंदाजे 711 Km)

सध्याच्या देशात अनेक ट्रेन्स (इंडिया टॉप स्पीड ट्रेन्स) आहेत, ज्या 150Km प्रतितास पेक्षा जास्त वेगाने धावतात. मेड इन इंडिया वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा कमाल वेग 180 Km/h आहे. तस अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रायल रन दरम्यान केवळ 52 सेकंदात 0 ते 100 Km/h वेग गाठून बुलेट ट्रेनचा विक्रमही मोडला आहे.