कापसाचा हमीभाव सात हजार 20 रुपये असतानाही शेतकऱ्यांना सहा हजार 300 ते साडेसहा हजारांचा दर दिला जात होता. दरम्यान आंतरराष्ट्रीय कंपन्याकडून कापूस गाठी खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापसाला आता सात हजार 25 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, बाजारात आवक वाढली आहे.
दोन वर्षांपासून कापूस 12 ते साडेबारा हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. यावर्षी मात्र कापसाला केवळ सात हजार 20 रुपयेच हमीभाव जाहीर करण्यात आला. त्यातही सीसीआय आणि पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांचा ठावठिकाणा नसल्याने खासगी बाजारात कापसाचे भाव पडले शेतकऱ्यांचा कापूस आतापर्यंत अवघ्या सहा हजार 300 ते साडेसहा हजार रुपये दरानेच खरेदी सुरू होता.
दरम्यान आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कापूस गाठींची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. त्याचेच परिणाम म्हणून कापसाला सात हजार 25 रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. या दरवाढीमुळे बाजारात कापसाची आवक वाढली आहे. तसेच शेतकऱ्यांनाही थोडाफार दिलासा मिळाला आहे. आगामी पाच ते आठ दिवसांत या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांबद्दल बोलायचे झाले तर, आज अकोट बाजार समितीत एच-4 – मध्यम स्टेपलच्या कापसाला 7,665 रुपये दर मिळाला.
देउळगाव राजा समितीत कापसाचा भाव 7,500 रुपये प्रति क्विंटल आहे. समुद्रपूर मंडईत कापसाचा भाव 8,300 रुपये प्रतिक्विंटल आहे. हिंगणघाट मंडईत कापसाचा भाव 7,370 रुपये प्रतिक्विंटल आहे. यवतमाळच्या पांढरकवडा बाजार समितीत ए.के.एच. 4 – मध्यम स्टेपलच्या कापसाल 9,675 रुपये सर्वाधिक दर मिळाला.
पहा आजचे कापूस बाजारभाव..
सोयाबीनचे दर जैसे थे..
जिल्ह्यात कापसापाठोपाठ सोयाबीनची लागवड शेतकरी करतात. कापूस आणि सोयाबीन ही जिल्ह्याची मुख्य पिके असून, या दोन पिकांवरच बहूतांश शेतकऱ्यांची मदार असते. परंतु गत काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दुसरीकडे शेतमालाला हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. सोयाबीनला आज रोजी चार हजार 100 ते चार हजार 300 एवढाच दर मिळत आहे. सोयाबीनचे दर जैसे थे असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.