राज्यात सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. राज्यात अद्यापही सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली नाही, त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात बँकांनी उदासीनताच दाखवलेली आहे.
सद्यस्थितीत राज्यातील 37 लाख 41 हजार शेतकऱ्यांना 27 हजार 101 कोटी रुपयांचे पीककर्ज बँकांनी पुरवले आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीने खरीप हंगामासाठी राज्यातील बँकांना 49 हजार 692 कोटी रुपयांचे पीककर्ज 49 लाख 9 हजार 806 शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.
1 जूनपासून ते आजपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना उद्दिष्टांप्रमाणे पीककर्ज देण्याकडे बँकांनी दुर्लक्षच केले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील अनेक शेतकऱ्यांना खरीप पीक पेरणीच्या जुळवाजुळवीसाठी खासगी सावकारांचे दार ठोठावावे लागल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या बँकर्स समितीने आढावा बैठक घेऊन उद्दिष्टांप्रमाणे पीककर्ज वाटप करण्यासाठी बँकांना तंबी देण्याची गरज आहे.
30 जूनपर्यंत राज्यातील बँकांनी एकूण उद्दिष्टाच्या 55 टक्के म्हणजेच 37 लख 41 हजार 110 शतकऱ्यांना 27 हजार 101 कोटी 36 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. अशी माहिती सहकार विभागाने दिली.
पीककर्ज वाटपात राज्यातील सर्वच जिल्हा बँकांनी आघाडी घेतली आहे. राज्यातील 31 जिल्हा बँकांनी 27 लाख 81 हजार शेतकऱ्यांना 14 हजार 531 कोटींचे, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी 9 लाख 60 हजार शेतकऱ्यांना 12 हजार 570 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. एकूणच पीककर्ज वाटपाच्या बाबतीत असलेली राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता कायम दिसते.
विभागनिहाय पीककर्ज वाटप..
कोकण : 730 कोटी 17 लाख
नाशिक : 5 हजार 999 कोटी 9 लाख
पुणे : 5 हजार 947 कोटी 34 लाख
औरंगाबाद : 5 हजार 802 कोटी 83 लाख
अमरावती : 5 हजार 411 कोटी 8 हजार
नागपूर : 3 हजार 213 कोटी 24 लाख
एकूण : 27 हजार 101 कोटी 36 लाख
अशी आहे पीककर्ज वाटपाची स्थिती..
खरीप हंगामासाठी बँकांना 49 हजार 692 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट..
49 लाख 9 हजार 806 शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट
राज्यातील जिल्हा बँकांकडून 27 लाख 81 हजार शेतकऱ्यांना 14 हजार 531 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप
व्यापारी, खासगी व लघुवित्त बँका, ग्रामीण बँकाकडून 9 लाख 60 हजार शेतकऱ्यांना 12 हजार 570 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप