देशातलं हवामान झपाट्याने बदलत आहे. पहाडांवर बर्फवृष्टी झाल्याने मैदानी भागात हवामान बदलत आहे. जोरदार वारे वाहत असून त्यामुळे थंडी वाढली आहे. दुसरीकडे, दक्षिणेकडील राज्यांमध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 8 डिसेंबरपासून तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र लवकरच चक्री वादळाचं रूप धारण करू शकतं, अशी माहिती IMD ने दिली आहे.
मच्छिमारांनी सावधगिरी बाळगावी आणि पुढील काही दिवस बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. आयएमडी अलर्ट अंतर्गत NDRF अरक्कोनमच्या 6 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यात काय परिस्थिती ?
दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे थंडी कमी झाली आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यात काही भागांत हलका पाऊस झाला. तसेच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात किमान तापमानात वाढ झाली आहे.
त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन खरीपाची पिके काढणीला आली असताना, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब :-
हवामान खात्यानुसार, आज मंगळवारी दिल्ली-एनसीआरमध्ये किमान तापमान 8 अंश आणि कमाल तापमान 25 अंश असू शकतं. दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. मंगळवारी सकाळी राष्ट्रीय राजधानीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहिली आणि गुणवत्ता निर्देशांक 321 वर नोंदवला गेला.
उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हवामान थंड
उत्तर प्रदेशच्या हवामानाबाबत हवामान खात्याचे म्हणणे आहे की, पुढील 3 ते 4 दिवस सकाळी हलके धुके राहील, तर थंडी वाढेल. बिहारमधील हवामान आता सामान्य होईल. राज्यातील दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-मध्य जिल्ह्यांमध्ये थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फबारीचा इशारा :-
हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोरही वाढण्याची शक्यता आहे.