Pune Metro : आता दापोडी ते निगडीपर्यंत प्रवास सुसाट, मार्गावर असणार 10 मेट्रो स्टेशन, पहा नवा रूट मॅप..
शहरवासीयांच्या मागणीनुसार अखेर पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत आहे. या मेट्रो मार्गिकचे भूमिपूजन झाले असून कामही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गावर तीन स्टेशन प्रस्तावित असताना आणखी एक मेट्रो स्टेशन वाढविण्यात आले आहे. निगडी येथील टिळक चौकात चौथे अतिरिक्त स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटींचा अधिकचा खर्च होणार आहे.
या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे. शहरात दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली आहे. त्या मार्गावरून पुणे शहराकडे मेट्रोने प्रवाशांची ये-जा सुरू झाली ये आहे. पिंपरीच्या पुढे हा मेट्रो मार्ग निगडीच्या भक्ती – शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत वाढविण्यात येणार आहे.
हे अंतर ४.४१ किलोमीटर इतके आहे. त्या मार्गावर चिंचवड स्टेशन चौक, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि भक्ती – शक्ती समूह शिल्प चौक असे तीन मेट्रो स्टेशन असणार होते.
त्या डीपीआरला महापालिका सर्वसाधारण सभेने २० डिसेंबर २०१८ ला दिली आहे. तसेच, सुधारित डीपीआरला महापालिका सर्वसाधारण सभेने २० मे २०२१ ला मंजुरी दिली आहे.
या मार्गावर निगडीतील टिळक चौकात अतिरिक्त मेट्रो स्टेशन उभारण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून महापालिका व महामेट्रोकडे वेळोवेळी करण्यात आली होती. त्या स्टेशनसाठी अंदाजे ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे स्टेशन महामेट्रोकडून उभारले जाणार आहे. त्याला महापालिकेची तत्वतः मान्यता मिळणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका, राज्य व केंद्र शासनाकडून निधी उभारणीबाबत निर्णय होईल, असे महामेट्रोने महापालिकेस कळविले होते. त्यानुसार टिळक चौकात नवे मेट्रो – स्टेशन उभारण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.
दापोडी ते निगडी मार्गिकेवर दहा मेट्रो स्टेशन..
पिंपरी ते निगडी मार्गावरील टिळक चौकातील या मेट्रो स्टेशनमुळे शहरवासीयांना आणखी एक मेट्रो स्टेशन उपलब्ध होणार आहे. विस्तारित मार्गिकेवर एकूण चार मेट्रो स्टेशन होणार आहेत. तर, यापूर्वी सुरू झालेल्या पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेवरील महापालिका हद्दीत दापाडीपर्यंत सहा मेट्रो स्टेशन झालेले आहेत. मेट्रोच्या विस्तारानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मार्गावर एकूण दहा मेट्रो स्टेशन असणार आहेत. त्यामुळे त्या भागातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यापारी व व्यावसायिक आदी मेट्रो प्रवाशांची सोय होणार आहे..