मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातील (हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) पहिला टप्पा प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला आहे. तर उर्वरित भाग हा येत्या तीन महिन्यात सुरु होईल अशी अपेक्षा आहे. हा संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे. मात्र केंद्र सरकार तर्फे देखील दिल्ली-मुंबई दरम्यान एक्स्प्रेस वे बांधण्यात येत आहे.
त्याचे बांधकामही सध्या जोरात सुरू आहे. हा एक्स्प्रेस वेही या वर्षाअखेर तयार होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
पीएम नरेंद्र मोदींने केले समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नागपुरात अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. यामध्ये त्यांनी नागपूर ते छत्तीसगडमधील बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला तर महामार्गच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा ५२० किलोमीटरचा असेल.
पाच तासाचा प्रवास 10 तासांत
प्रवाश्यांसाठी खुला झालेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी असा असणार आहे. या महामार्गामुळे सदरच्या दोन शहरांमधील प्रवासाचा कालावधी जो 10 तासांचा आहे, तो पाच तासांवर आणला जाणार आहे. या महामार्गाचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असणार आहे. हा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातील तब्बल 10 जिल्ह्यातून जात आहे.
कधी पूर्ण होणार दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग ?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारीच मध्य प्रदेशातील रीवा येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले की दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत तयार होईल. या महामार्गाच्या निर्मितीमुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार आहे.
जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे
हा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे देखील असणार आहे. 1380 किमी लांबीचा हा द्रुतगती मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जात आहे. त्यामुळे दिल्ली ते मुंबई हा प्रवास केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे. सध्या या दोन शहरांमधील प्रवासाला 24 तास लागतात. म्हणजे प्रवासाचा वेळ अर्ध्याने कमी होणार आहे.
वन्य प्राण्यांचीही घेतली आहे विशेष काळजी
वन्यजीवांसाठी ग्रीन ओव्हरपासची सुविधा असलेला हा आशियातील पहिला एक्सप्रेस वे आहे. यामुळे वन्य प्राण्यांना जंगलात फिरताना रस्ता ओलांडावा लागणार नाही.
त्यांच्यासाठी रस्त्याच्या खाली एक खास मार्ग तयार करण्यात आला आहे, तेथून हे वन्यप्राणी आरामात विहार करू शकतील. पूर्वी अशी सोय नसल्याने वन्य प्राणी रस्त्यावर येऊन अनेकदा अपघाताला बळी पडत.
8 लेनचा रास्ता 12 लेन पर्यंत वाढवणे शक्य होणार
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग सध्या बनवताना आठ पदरी द्रुतगती मार्ग बनवला जात आहे. मात्र येत्या काही काळात गरज पडल्यास हा महामार्ग 12 लेन पर्यंत वाढवला जाऊ शकतो. त्यासाठी जमिनीसह सर्व व्यवस्था देखील करण्यात आली आहे. याया महामार्गावर वर ताशी 120 किमी वेगाने वाहने धावतील. यासोबतच या महामार्गावर इंडस्ट्रियल कॉरिडॉरही विकसित करण्यात येत आहे. हा एक्स्प्रेस वे खर्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा एक्स्प्रेस वे ठरेल, असा विश्वास सगळीकडून व्यक्त केला जात आहे.
ही शहरे होणार कनेक्ट
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग पूर्ण झाल्यानंतर जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा या देशातील आर्थिक केंद्रांशी संपर्क वाढवण्यात मदत होईल. त्यामुळे शहरांतील आर्थिक घडामोडींना चालना मिळेल. या द्रुतगती मार्गावर हेलिपॅड बांधण्याचीही योजना आहे. त्यामुळे अपघात झाल्यास जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करता येईल.
काय आहेत द्रुतगती मार्गाची वैशिष्ट्ये
9 मार्च 2019 रोजी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची पायाभरणी करण्यात आली. या महामार्गाच्या बांधकामात एकूण 12 लाख टन स्टीलचा वापर केला जात आहे. एवढ्या स्टीलमध्ये तब्बल 50 हावडा पूल बनवता येतील. तसेच यामध्ये 35 कोटी घनमीटर माती आणि 80 लाख टन सिमेंटचा देखील वापर केला जात आहे. म्हणजे देशात वर्षभरात उत्पादित होणाऱ्या सिमेंटपैकी दोन टक्के सिमेंटचा वापर केवळ या महामार्गाच्या बांधकामासाठी झाला आहे.
एक्सप्रेस वे बनवण्यासाठी किती होणार खर्च
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग तयार करण्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या महामार्गाची एकूण लांबी 1382 किमी आहे. हा एक्स्प्रेस वे ऍक्सेस कंट्रोल्ड असणार आहे. एक्स्प्रेस वेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 32 कोटी लिटर इंधनाच्या वापरात घट होणार आहे. तसेच, 85 कोटी किलो कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन कमी होईल, जे चार कोटी झाडे लावण्याइतके असेल.
हे पर्यावरणासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. महामार्गावर प्रत्येक 500 मीटर अंतरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असणार आहे. यासोबतच द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला 40 लाख झाडे लावण्याचे नियोजन आहे.
अनेक राज्यांना होणार फायदा
या एक्स्प्रेस वेच्या उभारणीने केवळ दिल्ली आणि मुंबईतील लोकांनाच नव्हे तर देशातील अनेक राज्यांना फायदा होणार आहे. या द्रुतगती महामार्गाचा 120 महाराष्ट्रातील, 160 किमी भाग हरियाणामधून, 374 किमी भाग राजस्थानमधून, 245 किमी भाग मध्य प्रदेशात आणि 423 किमी भाग गुजरातमधून जातो. यामुळे उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा, जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड या शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.