महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी पुणे जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी कोसळल्या. तर इंदापूर शहरात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.
यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या अवकाळी पावसामुळे इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्याचठिकाणी दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास काही तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर शेतकऱ्यांची मात्र या पावसाने चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. हवेत आद्रता वाढल्याने रब्बी पिकांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट जारी
राज्यात कोल्हापूर शहराच्या काही भागांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली होती. अवकाळी पावसानंतर तापमानातही घसरण झाली असून वातावरणात थंडी अधिक जाणवत आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसत आहे. सिद्धनेर्ली, बामणी, शेंडूर, शंकरवाडी आदी गावांमध्ये पाऊस सुद्धा झाला आहे. या परिसरामध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शेतकऱ्यांना आपला सुका चार झाकावा लागला.
सध्याच्या वातावरणाला कारणीभूत असलेल्या मँडओस वादळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Video : अहमदगर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचं संकट#ahmednagar #Rain pic.twitter.com/h2v8jZw2Mz
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2022
काही भागांत तर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरला तर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
पुन्हा दोन दिवस ढगाळ वातावरण
अहमदनगर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पुन्हा ढगाळ वातावरण राहणार आहे. यादरम्यान पाऊस कोसळण्याची देखील शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांनी शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सध्या हलक्या ते अति हलक्या स्वरुपाच्या अवकाळी पावसामुळे तसेच तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकाच्या पिकांवर परिणाम दिसून येतो. तापमानात घट झाल्यामुळे रोपांची वाढ खुंटते तर मोठ्या प्रमाणावर बुरशीचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो.
या व्यवस्थापनाकरिता रात्री पिकांवर पॉलिथीन पसरवून ठेवावे जेणेकरून घटलेल्या तापमानाचा पिकांवर परिणाम होणार नाही, असे आवाहन कृषी विभागातर्फे केले जात आहे.