Samruddhi Mahamarg Toll : ट्रकला तब्बल 4,472 रु. टोल, तर कारसाठी लागतोय इतका टोल पण, महामार्गाचा ‘या’ जिह्यांना ‘असा’ बसला फटका !
701 किमी लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा रविवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यानंतर तीन महिन्यांत शिर्डी ते मुंबईचे दरम्यानचे कामही पूर्णत्वास येणार आहे, त्यानंतर प्रवाश्यांसाठी मुंबई ते नागपूरदरम्यान वाहतुकीचा मार्ग मोकळा होईल.
सध्या मुंबई जळगाव नागपूर या मार्गाचे अंतर 840 किलोमीटर आहे. नव्याने तयार झालेल्या समृद्धी महामार्गाने प्रवास केल्यावर 139 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. तसेच प्रवाश्यांसाठी 8 पदरी 120 मीटर रुंदीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सोयीचा असणार आहे. त्यामुळे जळगावकडून जाणारी वाहतूक ४० टक्क्यांनी कमी होईल.
जड वाहनांसाठी टोल किती ?
समृद्धी महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 2 रुपये 79 पैसे इतका खर्च येणार आहे. बस, ट्रक किंवा अन्य जड वाहनांसाठी 5 रुपये 85 प्रतिकिलोमीटर असा दर असणार आहे. त्याचप्रमाणे मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांसाठी 6 रुपये 38 पैसे प्रतिकिलोमीटर दर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर जाणाऱ्या एका मोठ्या ट्रकला 4 हजार 472 रुपये इतका टोल लागेल.
छोट्या वाहनांसाठी टोल किती ?
समृद्धी महामार्गावर कारने प्रवास केल्यास प्रतिकिलोमीटर 1 रुपया 73 पैसे या दराने किंमत मोजावी लागणार आहेत. या महामार्गावर जितके किलोमीटर अंतर तुम्ही पार केलं असेल तितकेच पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. जर तुम्ही नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटरचा प्रवास कारने करणार असाल तर तुम्हाला 900 रुपये भरावे लागतील. तेच जर तुम्ही नागपूर ते मुंबई असा प्रवास केला तर तुम्हाला 1200 रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागणार आहे.
सर्वसामान्यांना परवडणारा आहे का ?
समृद्धी महामार्गामुळे मुंबई – नागपूरदरम्यानचे 139 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. सध्या वापरात असलेल्या मुंबई जळगाव नागपूर या मार्गाचे अंतर ८४० किलोमीटर आहे. त्यामुळे या महामार्गावरून कारने प्रवास केला तर दहा ते 12 लिटर डिझेल / पेट्रोल वाचणार तर आहेच, तसेच वेळही कमी लागेल. जड वाहतुकीसाठी देखील समृद्धी महामार्गाच उजवा ठरेल अशी चिन्हे आहेत, कारण या महामार्गावर 25 ते 30 लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे अर्थातच २००० ते २५०० बचत होणार आहे. म्हणजेच ट्रकचालकाला मुंबई – नागपूरदरम्यान साधारणत 2 हजारांचाच टोल लागणार आहे. सद्य:स्थितीला जळगाव मार्गे मुंबई – नागपूरला जाताना ट्रकचालकाला 3500 रुपयांपर्यंतचा टोल भरावा लागत आहे.
जळगावला बसणार मोठा फटका
मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाने जळगावकरांना मात्र चिंताग्रस्त केले आहे . मुंबई नागपूरदरम्यानची वाहतूक समृद्धी महामार्गावरून वळणार असल्याने जळगावातील असंख्य व्यवसाय धोक्यात येणार असे दिसत आहेत.
समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जात आहे. सध्या मुंबई, नाशिक, गुजरातकडून छत्तीसगड ओडिसा, प. बंगाल, झारखंडकडे जाणारी बहुतांश वाहने जळगाववरूनच जातात.
याच मार्गे नाशिकहून द्राक्षे, कांदे आणि टोमॅटोची उचल होते. त्यामुळे महामार्गावर असणाऱ्या हॉटेल्स, पेट्रोल पंपांसह अन्य व्यवसाया देखील तेजीत सुरु आहेत. मात्र, समृद्धी महामार्ग प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होताच या सर्वच राज्यांत जाणारी वाहतूक जळगावला ‘बायपास’ करून जाणार आहेत. त्यामुळे जळगावातील अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे.
यात सर्वात मोठे नुकसान छोट्या व्यावसायिकांना होणार असे दिसत आहे. सध्या वापरात असलेल्या महामार्गावर नाश्ता , चहा , जनरल स्टोअर्स , ढाबे , पानठेले उभारून उदरनिर्वाह करणाऱ्या छोटया व्यावसायिकांना समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. हातावर पोट असल्याने या विक्रेत्यांची यामुळे मोठी कोंडी होणार आहे.