शेतीशिवार टीम : 07 सप्टेंबर 2022 : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सन : 2021-22 पुरवठा करण्याबाबतचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला असून या योजनेअंर्तगत लाभार्थ्यांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. (Mini Tractor Subsidy Yojana Maharashtra)

तर शेतकरी मित्रांनो या 90 टक्के ट्रॅक्टर अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ? अटी व शर्ती काय आहेत ? अनुदान कसं मिळणार ? काय कागदपत्रे लागतील ? कोणत्या जिल्ह्याचे अर्ज सुरु झाले आहेत? या बद्दलची सर्व माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.त्यामुळे तुम्ही ही माहिती शेवट्पर्यंत नक्की वाचा…

काय आहेत, योजनेच्या अटी आणि शर्ती :- 

1) अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.

2) स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.

3) स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील असावेत.

4) मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील.

5) स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10% स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90% (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील

6) लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्ती (9 to18 HorsePower) पेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना ( रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.

7) स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बॅकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे, निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे (परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

8) निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्या नंतर व खातर जमा करुन लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा 50% हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल.

9) उर्वरित 50 टक्के अनुदान मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ (RTO) कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ (RTO) कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यावर 100% अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाचे बँक खात्यात जमा करण्यात येईल.

10) बचतगटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्ट्रच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात यावे.

11) या योजनेअंतर्गत बचतगटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने देण्यात आलेला मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने विकता येणार नाही, अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही.

12) लाभार्थ्यांने मिनी टॅक्ट्रस विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहाय्यता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांकडून शासनाने मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी खर्च केलेली संपूण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित बचतगटाला शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान 5 वर्षे अपात्र ठरविले जाईल. अशा आशयाचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटांना करुन द्यावे लागेल.

वरील अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी – बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, नियोजन विभागाच्या 5 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार वस्तु स्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्या बाबतचा निर्णय असल्याने खालील कागदपत्रे आवश्यक असतील..

कागदपत्रे :-

1) बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स – प्रत.
2) गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत.
3) बचत गटाचे घटनापत्र.
4) बचत गट कार्यकारणी सदस्याची मुळ यादी.
5) सदस्याचा स्वत:चा जातीचा दाखला.
6) कोऱ्या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख.
7) मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात (लागू असल्यास ) आणि विमा उतरविणेचा खर्च बचत गटांना करावयाचा आहे.

बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज सादर करावे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील यांची नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जे स्वयंसहाय्यता बचत गट या योजनेसाठी इच्छुक असतील त्यांनी नमूद केलेले कागदपत्र लेखी अर्जासह सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, परभणी यांच्याकडे 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, परभणी यांनी केले आहे.

टीप :- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ही ट्रॅक्टर योजना मुंबई व मुंबई उपनगर सोडून इतर सर्व जिल्ह्यांत लागू आहे. त्यामुळे ही योजना इतर जिल्ह्यातही कधी सुरु होईल याबाबत आपण अपडेट तर पाहुयाचं…

परंतु, ज्या जिल्ह्यात अद्यापही अर्ज सुरु झाले नाहीत, त्या जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *