समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेले दोन घटक म्हणजे शिक्षक आणि शेतकरी. हे दोन्ही पेशे वेगवेगळे असले तरी शिक्षक विद्यार्थी घडवून त्यांना सुजाण बनवतो तर शेतकरी काळ्या आईची सेवा करून जगाचा पोशिंदा ठरतो. दोघेही आपल्या कृतीतून समाज घडवण्याचेच कार्य करत असतात. मात्र चिमुकल्यांना ‘अ, आ, इ , ई’ चे धडे गिरवणारे हात काळ्या मातीत राबले तर त्याचे देखील सोने करू शकतात.
दिलीप भीमराव काळबांडे यांनी हे दाखवून दिले आहे. स्वतःच्या हक्काच्या शेतीत राबून त्यांनी 12 एकरांत 100 क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले आहे.
दिलीप भीमराव काळबांडे हे नागपूर जिल्ह्यातील नरखेर येथील अंबाडा गावात एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून १२ एकरांत विविध कपाशीच्या वाणांची लागवड केली होती. सिंचनासाठी आधुनिकतेची कास धरीत त्यांनी यासाठी ठिबक सिंचनचा पर्याय निवडला.
अनुभवी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून त्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन शेतीचे धडे गिरविले. कपाशीवरील कीड व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती घेऊन अभ्यासपूर्ण नियोजन केले.
हे सर्व करत असताना दुसरीकडे सकाळी 10 ते 5 पर्यंत शाळेत राहून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील पार पडली. कपाशीला वेळेवर पाणी, खते देऊन फवारणी देखील केली.
सुरवातीला एका कपाशीच्या झाडाला दीडशे ते दोनशे बोंडे आली त्यावेळी कापसाला प्रतिक्विंटल 7 हजार 200 रुपये इतका भाव होता आता सध्या 9000 दर आहे.
आगामी काळात हा भाव 10 हजार रुपयांवर जाऊ शकतो. दिलीप काळबांडे यांना आतापर्यंत 100 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. येत्या काळात हेच उत्पादन 150 क्विंटलपर्यंत जाईल, आणि एकूण खर्च वजा जाता 25 लाख रुपये निव्वळ नफा हातात येईल. असा विश्वास शिक्षक काळबांडे यांनी व्यक्त केला आहे.
काळबांडे यांच्या विक्रमी उत्पादनाने त्यांची ओळख सध्या परिसरात ‘ कापूसवाले शिक्षक म्हणून होत आहे. एकीकडे शेकडो बेरोजगार तरुण शेती कसणे कमीपणाचे आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात.
तर काही तरुण शेती परवडत नाही, शेती बिना नफ्याचा व्यवसाय आहे अशी कारणे देत असतात. परंतु, काळबांडे यांनी योग्य पद्धतीने नियोजन केल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे प्रत्यक्षात दाखवून दिले.
मला पहिल्यापासून शेती करण्याची आवड आहे, त्यामुळे शिक्षकीपेशा सांभाळून मी शेतीत लक्ष घालतो. कापूस हे उत्पन्नाच्या दृष्टीने चांगले पीक आहे. या पिकासाठी रिस्क घ्यावी लागते मात्र शेतीमध्ये आवड, प्रबळ इच्छा असल्यास व प्रामाणिक पणे कष्ट घेतल्यास नक्कीच फळ मिळते असे दिलीप काळबांडे, शिक्षक तथा कापूस उत्पादक शेतकरी, यांनी सांगितले.