यंदाच्या हिवाळ्यात उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत असल्याचे दिसत आहे. काश्मीर-लडाखपासून उत्तर भारतातील मैदानी भागापर्यंत तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे तर दुसरीकडे, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याचे दिसून आहे.

ऐन हिवाळ्यामध्ये भारताच्या दोन भागांत वेगवेगळी स्थिती असल्याचे यामुळे दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, मँडओस चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात थंडीचा जोर कायम !

उत्तर भारताबद्दल बोलायचे झाले तर उत्तर भारतात पारा सातत्याने घसरत आहे. हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंड वारे वाहत आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

मँडोस चक्रीवादळाचा परिणाम

मँडोस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मच्छिमारांना पुढील दोन दिवस मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांना किनारपट्टी पासून दूर राहण्यास सांगितले आहे.

मँडोस चक्रीवादळामुळे मागील चार दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्याच्या प्रभावामुळे तामीळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्ट्यांवर जोरदार पाऊस होत आहे. मँडओस चक्रीवादळाचा सातत्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये परिणाम होताना दिसत आहे. चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती?

काही दिवसांपासून चक्रीवादळाचा जोर कमी झाला होता. मात्र यानंतर पुन्हा उत्तर केरळ ते मध्यपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. याचाच प्रभाव कायम ठेवत 13 डिसेंबर रोजी उत्तर केरळ आणि आसपासच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या भागांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. या भागात मंगळवारी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मँडओस चक्रीवादळ आणि उत्तर केरळ व आसपासच्या किनारपट्टीवर तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यांच्या प्रभावामुळे हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, कोकणातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड या भागात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ढगाळ वातावरणासह या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मात्र, बुधवारपासून पाऊस कमी होईल तर तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

रब्बी पिकांना बसणार फटका?

चालू वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणी लांबणीवर पडली. कशी बशी पेरणी झाली तर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ऐन काढणीच्या वेळेस हातातोंडाशी आलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागले होते.

आताचा पाऊस मुसळधार नसला तरी सततचे ढगाळ वातारण आणि माध्यम स्वरूपाच्या पावसाने रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणावर बुरशी व इतर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे रब्बीचे पीकही हातातून जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्याला बसला होता. या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं होत. आता अवकाळी पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, कोकणातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड या भागातील रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *