दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे : दिल्ली ते जयपूर प्रवास 3 तासांत..! किती असणार टोल, टोल प्लाझा कुठे-कुठे ? हाएस्ट स्पीडसहित डिटेल्स पहा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 फेब्रुवारी रोजी 1,386 किमी लांबीच्या दिल्ली – मुंबई मेगा एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केलं. एक्सप्रेसवेचा पहिला टप्पा दिल्ली ते जयपूर दरम्यान आहे. या एक्सप्रेस – वेमुळे प्रवासाचा वेळ 3.5 तासांवर आला आहे. हा मेगा-एक्स्प्रेस वे पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे, जे आतापर्यंत 24 तासांचे आहे.
हा संपूर्ण प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. उद्घाटनाबरोबरच आता लोकांना जाणून घ्यायचं आहे की, या मार्गावर किती टोल टॅक्स भरावा लागणार ? टोल टॅक्ससाठी प्लाझा कुठे असणार ? वाहनाचा वेग कितीपर्यंत असावा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत..
दिल्ली मुंबई एक्सप्रेस – वे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर 1,424 किमीवरून 1,242 किमी पर्यंत येणार असून प्रवासाचा वेळ निम्मा होणार आहे. आतापर्यंत दोन शहरांदरम्यान कारने जाण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागत होता, जो हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर केवळ 12 तासांवर येणार आहे.
हा एक्सप्रेस – वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना जोडला जाणार आहे. मुख्य शहरांमध्ये कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या नावांचा समावेश आहे.
किती भरावा लागणार टॅक्स :-
आता असा जबरदस्त रस्ता उपलब्ध झाला तर साहजिकच टोल टॅक्स भरावा लागणार. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस – वेच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून खलीलपूर सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. इथपर्यंत प्रवास करण्यासाठी हलक्या वाहनाने प्रवास करताना 90 रुपये टोल टॅक्स भरावा लागणार आहे. मिंट च्या अहवालानुसार, हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी हा दर 145 रुपये असणार आहे.
जर कोणी बरकापारा येथे गेला तर त्याला हलक्या वाहनातून प्रवास करताना 500 रुपये टोल टॅक्स भरावा लागेल, तर हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी 805 रुपये टोल टॅक्स लागेल.
खलीलपूर आणि बरकापारा व्यतिरिक्त, संसाबाद, शीतल, पिनान आणि डुंगरपूर येथेही टोलनाके असणार आहे. एंट्री पॉईंटवरून बरकापारा येथे 7 एक्सल वाहन गेल्यास 3,215 रुपये टोल टॅक्स भरावा लागेल. सोहना बाजूने प्रवेश करणाऱ्या वाहनांना वेस्टर्न पेरिफेरलमधील खलीलपूर वळणावर उतरताच हा टोल भरावा लागणार आहे.
120 किमी प्रतितास वेग :-
या एक्स्प्रेसवेवरील टॉप स्पीड लिमिट कायदेशीररित्या 120 किलोमीटर प्रति तास ठेवण्यात आली आहे. दिल्ली – मुंबई एक्सप्रेस – वे वर 40 इंटरचेंज आहेत, जे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या शहरांना अधिक चांगल्या प्रकारे जोडतील.
सोहना – दौसा सामुद्रधुनी हरियाणात 160 किमी आहे आणि गुरुग्राम, पलवल आणि नूह जिल्ह्यातून जाईल. यामध्ये गुरुग्राममधील 11, पलवलमधील 7 आणि नूह जिल्ह्यातील 47 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प 1 लाख कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.