सोयगाव पारंपरिक शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन करायचं या ध्यासानं गलवाडा (ता.सोयगाव) येथील तरुण शेतकरी रामकृष्ण पंढरी इंगळे याने ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. शेतात सिमेंट पोल लावतो. गावात दुचाकींचे टायर जमा करतो, याला वेड लागलं असं म्हणणाऱ्यांना एकाच वर्षात आलेले ड्रॅगन फ्रुट पाहून वेड लागायची वेळ त्याने आणली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथून जवळच असलेल्या गलवाडा येथे शेतकरी रामकृष्ण इंगळे यांची वडिलोपार्जित शेती आहे. या भागात प्रामुख्याने कपाशी आणि मका पीक घेतले जाते. परंतु, वाढता उत्पादन खर्च व अनिश्चित भाव यामुळे ही पिके परवडत नाहीत. त्यातच मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
यातून मार्ग काढायचा म्हणून कमी पाण्यावर येणारी फळबाग लावण्याचा विचार रामकृष्ण याने केला. त्याने यूट्युब, फेसबुकच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुटच्या शेतीविषयी माहिती मिळवली. अधिकच्या मार्गदर्शनाकरिता त्याने आष्टी (जि. बीड) तालुक्यातील केसावंगी आणि पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ड्रॅगन शेतीची पाहणी केली.
शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव जाणून घेतला. यानंतर एकरभर शेतात ड्रॅगनची लागवड करण्याचा निर्णय घेतला. दोन ओळीतील अंतर बारा फूट व दोन झाडातील अंतर सहा फूटप्रमाणे लागवडीचे नियोजन केले. त्यासाठी पाचशे सिमेंट पोल चार फूट उंच उभे करण्यात आले या पोलवरून ड्रॅगन फ्रुटची वेल बाहेर काढण्यासाठी वरच्या बाजूला दोन सळया लावून त्यावर दुचाकीचे जुने टायर फिट करण्यात आले.
पांढरे कलरच्या फळांची 1,000 रोपे 60 रुपये प्रमाणे व लाल कलरची 1,000 रोपे 65 रुपयेप्रमाणे खरेदी केले. प्रत्येक पोलवर चार रोपे लावण्यात आली त्या अगोदर 5 ट्रीप शेणखत टाकण्यात आले. वर्षभर मेहनत घेऊन जगविलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या वेली आता चांगल्या बहरत आहेत. पहिला तोडा एक क्विंटल 10 किलोंचा झाला. त्यास 160 रुपये किलोचा भाव मिळाला. त्यास अजूनही फूल लागलेली असल्याने फळ येतील. पहिल्या वर्षी 80 हजार ते 1 लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.
ज्यांनी वेड्यात काढले तेच करताहेत कौतुक..
शेतात ड्रॅगन फुट लावण्यासाठी सुरुवातीला सिमेंट पोल उभे केले. त्यावर लावण्यासाठी जुने टायर मी गावातून गोळा करत असताना मला लोक अक्षरशः वेड्यात काढत होते, हसत होते. मात्र मी खचून न जाता एकाच वर्षात ड्रॅगन फुटची फळ घेऊन दाखविले. आज तेच लोक माझं कौतुक करीत असल्याचे शेतकरी रामकृष्ण इंगळे यांनी सांगितले.
एक वर्ष मेहनत घेतल्यास वीस वर्षे फळ देणार हे पीक कमी पाण्यात येणारे आहे. मे ते डिसेंबर अशी आठ महिने उत्पन्न देणारे हे पीक आहे. त्यास जंगली जनावरे खात नाहीत, काटे असल्यामुळे माकड त्रास देत नाही. आंतरपीक घेता येते. एक फळ किमान अर्धा किलोचे भरते, त्यामुळे उत्पन्नही चांगलं मिळतं अन् भावही चांगला मिळतो. तिसऱ्या वर्षीपासून खूप फळे यायला लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती करावी, असे आवाहनही शेतकरी इंगळे यानी इतर शेतकऱ्यांना केले आहे.
ड्रॅगन फ्रुटसाठी 1 लाख 60 हजारांचे अनुदान :-
खर्चाचा तपशील..
सिमेंट पोल 300X500 – 150000
रोप (लाल) 65X1000 – 65000
रोप (पांढरे) 60×1000 – 65000
सळई 7 क्विंटल – 49000
टायर 50X500 = 25000
शेणखत 10000
खड्डे खोदणे, पोल गाडणे – मजुरी 25000
ठिबक 30,000
असा एकूण चार ते साडेचार लाखांचा खर्च झाला.