वाढत्या महागाईचे चटके बसूल होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना खाद्य तेलाचे दर एकवर्षानंतर आवाक्यात आले असल्याने दिलासा मिळत आहे. यामुळे गृहिणींना महिना अखेरच्या बचतीस वाव मिळत आहे. किचनचे बजेट बिघडता बिघडता आता वाचले आहे. तेलाचे भाव कमी झाल्याने ग्रामीण भागात किरकोळ तेल विक्री ऐवजी 15 लिटरच्या डबा विक्रीत वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठात खाद्यतेल पुरवठा साखळी मागील वर्षी झालेल्या युक्रेन रशिया युद्धामुळे विस्कळीत झाली होती. ती आता जवळपास पूर्वपदावर आली आहे. शिवाय खाद्यतेलाच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन वावर अवलंबून असते.
यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात उठाव कमी असल्याने तेलाच्या किंमती घसरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. एकीकडे महागाई वाढत असताना सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यात काहीसा दिलासा खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये मिळाला आहे. मागील दोन महिन्यांपासून या सतत घसरण पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन वर्षात जवळपास सोयाबीन तेल प्रती 15 लिटर साठी 2300 ते 2500 रुपये इतकी प्रचंड वाढ झाली होती, तर किरकोळ तेल विक्री प्रती किलोसाठी 180 ते 200 रुपये इतकी झाली होती.
सध्या हेच दर सोयाबीन तेल डब्यासाठी 1380 ते 1390 पर्यंत आल्याने व किरकोळ 1 किलो तेला करिता 100 रुपये प्रति किलो सद्या बाजारात सुरु आहे. तर सूर्यफूल तेल डब्यासाठी 1550 ते 1600 पर्यंत आले आहेत. तसेच लग्न समारंभ, विविध प्रकारचे सण-उत्सव, हॉटेल व्यवसाय यासाठी खाद्य तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परिणामी हॉटेल व्यवसायमध्ये तेलाच्या दरावर इतर खाद्य पदार्थांचा दर अवलंबून असतो.
तेलाचे भाव वाढल्याने मध्यतरी काही खाद्यपदार्थची भाववाढ झाली होती, मात्र तेलाचे दर कमी झाल्याने आता खाद्यपदार्थचेही भाव आता पूर्व पदावर आले असल्याचे येथील हॉटेल व्यवसायिक गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच मोठ्या सुख – दुःखाच्या समारंभात जेवणावळीत वाढत्या तेल दरामुळे खर्च वाढला होता. आता तो कमी झाला असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
विक्रीत वाढ..!
दोन महिन्यांपासून खाद्य तेलाच्या दरात सतत घसरण होत असल्याने, तेलाच्या डबा विक्रीत वाढ झाली असली तरी, बदलत्या तेल दराचा परीणाम अगोदर खरेदी केलेल्या तेलावर होत असल्याने अनेक वेळा नुकसान सहन करावे लागत आहे. दिनेश पारख, संचालक पारख ट्रेडर्स , चितळी
दर सर्वसामान्य पर्यंत पोहचवावे..!
उत्पादक, तेल शुद्धीकरण उद्योजकाकडून जेव्हा तेलाचे वितरण वितरणकांसाठी विक्री दरांमध्ये कपात होऊन होते. तेव्हा त्याचा फायदा प्रत्येक ग्राहकांच्या खिशाला मिळाला पाहिजे. यासाठी अन्न व प्रशासन विभागाने दक्ष राहून, दर व भेसळयुक्त तेल यांच्यावर करडी नजर ठेवणे गरजेचे आहे.
विक्रमी तेलबियांचे उत्पादन..!
सन 2022 – 23 मध्ये सोयाबीन व कापूस या पिकांना उच्चांकी बाजारभाव मिळाला. परिणामी त्यानंतर तेलबिया क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विक्रमी उत्पादन झाले, मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली.