शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी । नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ₹50,000 प्रोत्साहन अनुदान !

0

ॲग्रो – मराठी टीम, 22 जून 2022 : सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वत्र संभ्रमावस्था व सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे आणि या सर्वांमध्ये जास्त अस्वस्थ आहे तो म्हणजे नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणारा शेतकरी.

कारण या शेतकऱ्यांना 1 जुलै 2022 पासून त्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल, अशा प्रकारची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली होती…

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे.

2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.

मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.

हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात आला आहे.

या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.