महाराष्ट्रात पुणे जवळील तळेगाव एमआयडीसी येथे प्रस्तावित असलेला Vedanta – Foxconn प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राज्यातून पळवला. या मुळे मोठं वादंग निर्माण झालं होतं. यावरुन शिंदे – फडणवीस सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. दुसरीकडे हा प्रकल्प गुजरातला गेला, याला आम्ही जबाबदार नाही तर ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, अशी मांडणी शिंदे फडणवीस सरकारने केली होती. या प्रकल्पावरुन सत्ताधारी – विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला होता. या राजकारणामुळे Foxconn ने Vedanta सोबतची भागीदारही तोडली होती.

परंतु, Foxconn या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेन्टची निर्मिती करणाऱ्या तैवानच्या कंपनीने तामिळनाडूमध्ये आपला प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मोबाईल कंपोनंट प्लांट उभारण्यासाठी राज्य सरकारसोबत इरादा पत्रावर स्वाक्षरी केली आहे. या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेन्ट संयंत्रातून 6,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तामिळनाडूचे उद्योगमंत्री डॉ. टीआरबी राजा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

फॉक्सकॉनची सपोर्टिंग कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट चेन्नईजवळील कांचीपुरममध्ये हा प्लांट उभारणार आहे. फॉक्सकॉनची ही सुविधा आयफोनच्या असेंबली प्लांटपासून वेगळी केली जाणार आहे. फॉक्सकॉन तामिळनाडूमध्येच ॲपलचा आयफोन असेंबल करते. या प्लांटच्या माध्यमातून आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. आता पुन्हा एकदा फॉक्सकॉनने गुंतवणुकीसाठी तामिळनाडूची निवड केली आहे. फॉक्सकॉनचा मोबाईल कंपोनंट प्लांट 2024 पर्यंत कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.

तामिळनाडू गुंतवणूकदारांची पहिली पसंती..

टीआरबी राजा म्हणाले की, गुंतवणूकदारांसाठी तामिळनाडू ही देशातील पहिली पसंती आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे. फॉक्सकॉनच्या नवीनतम गुंतवणुकीमुळे यात आणखी वाढ होईल. राजा म्हणाले की, फॉक्सकॉनची ही गुंतवणूक तामिळनाडूला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल.

विशेष म्हणजे, मे 2023 मध्ये देखील, तामिळनाडू सरकारने राज्यात वैद्यकीय उत्पादन कारखाना स्थापन करण्यासाठी जपानच्या ओमरॉन हेल्थकेअरसोबत सामंजस्य करार केला होता. कंपनी तामिळनाडूमध्ये स्वयंचलित रक्तदाब मॉनिटर्स असेंबल करणार आहे.

वेदांताशी केलेला करार मोडला..

फॉक्सकॉनने भारतात सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्मितीसाठी वेदांतसोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला. परंतु, नंतर कंपनीने यातून माघार घेतली. गेल्या वर्षी, दोन्ही कंपन्यांनी गुजरातमध्ये प्लांट उभारण्यासाठी राज्य सरकारसोबत 1.54 लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला होता. दोन्ही कंपन्या मिळून सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रॉडक्शन प्रकल्प उभारणार होत्या.

वेदांतासोबतचा करार मोडल्यापासूनच Foxconn भारतात गुंतवणुकीबाबत शंका होती. मात्र, कंपनीने भारतात आपली गुंतवणूक सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. आता तामिळनाडूमध्ये मोठी गुंतवणूक करून Foxconn ने दाखवून दिले आहे की, ते भारत सोडून तर जात नाही पण या राजकारणामुळे आता तुला ना मला, घाल कुत्र्याला…!  अशीच वेळ महाराष्ट्र – गुजरातच्या नागरिकांवर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *