गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शनिवार 16 सप्टेंबर ते रविवार 1 ऑक्टोबर दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागणार नाही. परंतु, मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवर टोल लागू राहणार आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी शासन आदेश जारी केला. टोलमाफीसाठी, ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ असे लिहिलेले स्टिकर्स टोलमाफी पासच्या स्वरूपात उपलब्ध झाले असून हे दाखवूनच तुम्हाला टोलमधून दिलासा मिळणार आहे.
त्या स्टिकरवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव लिहिले जाईल. वाहतूक विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस आणि संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या समन्वयाने पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौकी आणि आरटीओ कार्यालयात असे स्टिकर्स उपलब्ध करून दिले आहे. हा टोल माफीचा पास परतीच्या प्रवासासाठीही वैध असणार आहे. (गणेशोत्सव 2023)
मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या सूचना..
गणेशोत्सव काळात नागरिकांना पासची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलिस आणि वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी आणि अन्य सुविधा देण्याचे निर्देश दिले होते. त्याच आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन आदेश काढला आहे.
श्रावणापासून गणपतीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. या सगळ्यामुळे वातावरणात उत्साह संचारला आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणातील गावागावात चाकरमाने वाट पाहत आहे.
पार्किंगही फ्री..
मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, यंदा विसर्जनाच्या दिवशी विसर्जन स्थळाजवळील सार्वजनिक वाहनतळावर 24 तास मोफत सेवा दिली जाणार आहे.