साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला दरवर्षी सुवर्णनगरी म्हटल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात सोने – चांदीच्या खरेदीला उधाण येत असते. मात्र यंदा सोने – चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठत ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी मुहूर्ताच्या खरेदीवेळी सोने 72 हजार 200 प्रतितोळा तर जीएसटीसह 74 हजार 366 रुपयांवर पोहोचले. तसेच चांदी 83 हजार प्रतिकिलो व जीएसटीसह साधारणतः 84 हजारांवर पोहोचून नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे यंदा मुहूर्ताच्या खरेदीवर 50 टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले.
जळगावचा सुवर्णबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. सराफ बाजारात दररोज सोन्याचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत. मंगळवारी पुन्हा सोने वधारले असून तोळ्याचा दर 72 हजार 200 वर पोहोचल्याने नवा उच्चांक गाठला आहे.
24 कॅरेट सोने प्रतितोळा 72,200 तर 22 कॅरेटचे सोने 66 हजार 140 रुपये प्रतितोळा दराची मंगळवारी नोंद झाली.
गेल्या महिन्यातच सोन्याच्या दराने 64 हजारांचा टप्पा पार केला होता. तर वर्षभरात सोन्याचा दर तब्बल 14 हजारांनी वधारला आहे, हे विशेष.
आंतरराष्ट्रीय मंदी, मात्र सुवर्ण बाजार उच्चांकावर..
अमेरिकेतील बँकांची स्थिती बिकट असून बँकांनी व्याजदर कमी केले आहेत. चीनमध्ये अर्थव्यवस्था डळमळीत असून रशिया – युक्रेनचे युद्ध अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींनंतर सुवर्ण बाजारात मोठी तेजी पाहावयास मिळत आहे. सध्या अमेरिकेत बँकिंग क्षेत्र अस्थिर मानले जात आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दराने भरारी घेतल्याचे दिसून येत आहे.
मार्च महिन्यात सुवर्ण झळाळी :-
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. 5 मार्च रोजी दर तोळ्यामागे 850 रुपये दरवाढ होऊन 64 हजार 650 रुपये दर झाला होता. तर महिनाअखेरला सोने दरात 4 हजारांनी वाढ होत हा दर 68 हजार 600 वर स्थिरावला होता.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हा दर 70 हजारांवर पोहोचून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने दराने 72 हजार 200, तर चांदीने 83 हजारांचा टप्पा ओलांडून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
लग्नसराईमुळे ग्राहक धास्तावले :
सध्या लग्नसराई सुरू आहे त्यातच सोने – चांदीचे दर वाढत असल्याने ग्राहक धास्तावले असून सुवर्ण बाजारपेठेत सध्या मंदीचे वातावरण आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच्या आठवड्यात सोने 72 हजारांवर गेल्याने ज्या घरी लग्नकार्य आहे त्यांचे धाबे दणाणले आहेत. एप्रिलअखेर सोने जीएसटी वगळता 75 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुवर्णनगरीत सोने खरेदीला सध्या तरी अल्प प्रतिसाद आहे.
ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले तेदेखील आता मोड करत नसल्याचे पाहावयास मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण आहे. अमेरिकेत बँकांची स्थिती बिकट असून व्याजदर घटले आहेत. रशिया युक्रेन युद्ध व चीनची अर्थव्यवस्था डळमळीत असताना भारताची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे सोने – चांदीचे दर सध्या वाढत आहेत. आगामी काळात ते पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
पप्पूशेठ बाफना आर.सी.