दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या समस्येतून दिलासा देणारा भायखळा आरओबी (ROB) ऑक्टोबरपर्यंत तयार होणार आहे. या पुलाला जोडण्याचे काम सुरू झाले असून, त्यासाठी बेस्टच्या बसेस वळविण्यात येत आहेत. बेस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाऊन दिशेकडील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बस मार्ग क्रमांक C – 1, 4, A – 5, 6, 7, 8, 9, 11, 15, A-19, A-21, A-25, C-51, 67 आणि 69 ला उड्डाणपुलाखालून वळवण्यात आले आहे.
भायखळ्यात होणार केबल ब्रिज..
नवीन ROB बांधण्याचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) करत आहे. अधिकृत माहितीनुसार, भायखळा ROB ला केबल ब्रिज बनवण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व पुलांचे काम सुरू आहे, मात्र भायखळा आणि रे रोड पूल येत्या काही महिन्यांत पूर्ण होतील. या ROB ची क्षमताही वाढवण्यात येणार असून तो आता 6 लेनचा करण्यात येणार आहेत. नवीन ROB तयार झाल्यावर त्यावरील वाहतूक वळवून सध्याचे जुने पूल पाडले जाणार आहे.
45 टक्के काम झाले पूर्ण..
916 मीटर लांबीचे आणि 9.7 मीटर उंचीच्या भायखळा पुलाचे सुमारे 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. भायखळा पूल ईस्टर्न एक्सप्रेस – वेवर बांधला जात आहे, ज्याची अंतिम मुदत ऑक्टोबर 2024 आहे. भायखळ्यापूर्वी रे – रोड पुलाचे काम पूर्ण होईल, असे महारेलचे म्हणणे आहे. तर दादर पूल दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. नव्या पुलाचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण होणार आहे.
त्यामुळे सध्याच्या जुन्या पुलावरील वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दुसऱ्या टप्प्यात केबल पुलाच्या दुसऱ्या टोकाचे काम केले जाणार आहे. सर्व पुलांपैकी घाटकोपर ROB चे काम आव्हानात्मक आहे.
हायस्पीड रेल्वे आणि मेट्रो-4 मार्गही येथून जात आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये या पुलाचे काम सुरू झाले होते आणि आतापर्यंत सुमारे 12 टक्के काम पूर्ण झाले आहे.
कसे असणार पूल ?
1. रे रोड ROB
लांबी – 385 मीटर
उंची – 9.93 मीटर
लेन – 6 लेन
खर्च – 145 कोटी रुपये
सेल्फी पॉइंट्स – 3
2. भायखळा ROB
लांबी – 916 मीटर
उंची – 9.70 मीटर
लेन – 4 लेन (सध्याच्या ROB व्यतिरिक्त)
खर्च – 287 कोटी रुपये
सेल्फी पॉइंट्स – 1
3. दादर टिळक ROB
लांबी – 663 मीटर
उंची – 9.40 मीटर
लेन – 6 लेन
खर्च – 325 कोटी रुपये
सेल्फी पॉइंट्स – 4