Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यासह ‘या’ 18 जिल्ह्यांत आज गारपिटीचा इशारा ! IMD कडून येलो – ऑरेंज अलर्टही जारी..
कोकणवगळता राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाचा इशारा आणि ढगाळ वातावरणामुळे तसेच पिकांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळण्याच्या भीतीने बळीराजा चिंतेत सापडला आहे.
विदर्भ व मराठवाड्यावर पावसाला अनुकूल असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र, काही भागांत तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका कायम आहे.
रविवारी सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, सर्वात कमी तापमान पुणे येथे 20.9 अंश सेल्सिअस इतके होते. येत्या 8 ते 11 एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
तर, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस व सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना येलो – ऑरेंज अलर्ट..
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी https://t.co/jw7yrf8Es5 भेट द्यI pic.twitter.com/GJX96Gh9SG
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 7, 2024
IMD कडून राज्याच्या काही भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
तर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
24 तासांमध्ये जिल्हानिहाय नोंदवले गेलेले तापमान..
दरम्यान, रविवारी पुणे येथे 38.5 अंश सेल्सिअस तापमान होते, तर कोल्हापूर 38.6, महाबळेश्वर 32.6, मालेगाव 41.2, नाशिक 36.4, सांगली 40, सातारा 38.8, सोलापूर 42.2, मुंबई 33.5, रत्नागिरी 33.9, डहाणू 33.6, छत्रपती संभाजीनगर 37.4, परभणी 39.4, नांदेड 40.2, बीड 40.4, अकोला 39.2, अमरावती 36.2, बुलढाणा 36.6, ब्रह्मपुरी 39.8, चंद्रपूर 39.8, गोंदिया 31.6, नागपूर 32.5, वाशिम 39.4, वर्धा 34.8, तर यवतमाळ येथे 38 अंश सेल्सिअस तापमान होते.