फक्त 1 हजारांत मिटवा भावाभावांतील वाटणीचे वाद ! सलोखा योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद, ‘हे’ आहेत नियम व अटी..
शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांच्या आपापसांतील वर्षानुवर्षे प्रलंबित विवादांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाची सलोखा योजना राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी लाभदायी ठरत आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, तसेच दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे क्षेत्र अदलाबदल करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत सलोखा योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत नोंदवण्यात येणाऱ्या दस्तांसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क प्रत्येकी केवळ 1 हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागत आहे.
राज्यात जमिनीच्या वादांबाबतची हजारो प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याचे वाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजणीवरून होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद, शेती वहिवाटीचे वाद, भावाभावांतील वाटणीचे वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेचे वाद इ. कारणांमुळे शेतजमिनीचे वाद वाढत जाऊन आपसातील वितंडवाद टोकास गेले आहेत.
शेतजमिनीचे वाद अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालय आणि प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी हे वाद वर्षानुवर्षे सुरूच राहिले आहेत. अशा परिस्थितीत हे वाद कायमचे संपुष्टात यावेत, यासाठी शासनाने सलोखा योजनेला मान्यता देऊन अंमलात आणली आहे.
पहा काय आहेत नियम व अटी..
सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षांपासून असणे आवश्यक आहे.
अकृषिक, रहिवासी, तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनींसाठी ही योजना लागू होणार नाही.
दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवत आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणेदेखील आवश्यक आहे.
सलोखा योजनेअंतर्गत पंचनाम्यासाठी गावातील तलाठ्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. पंचनामा प्रमाणपत्रासाठी तलाठीकडे साध्या कागदावर अर्ज करता येईल.
सलोखा योजनेत जमिनीच्या पंचनाम्याच्या वेळेस कमीत कमी दोन सज्ञान व्यक्तींची पंचनामा नोंदवहीत सही आवश्यक आहे. त्यात दोन्ही शेतकऱ्यांचे सर्व्हे नंबर, तसेच चतुःसीमा गट नंबरचा उल्लेख करण्यात यावा.
शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर तलाठी कर्मचाऱ्याने सर्वसाधारण 15 दिवसांत पंचनामा करणे आवश्यक आहे.
वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी नोंदवून पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले जाईल. पंचनामा प्रमाणपत्र अदलाबदल दस्तास जोडणे आवश्यक आहे.
दस्ताची नोंदणी करताना दोन्ही गटांतील सगळ्या सहभागी शेतकऱ्यांची दस्त नोंदणीस संमती लागेल. ती नसल्यास अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही.
सलोखा योजना पुढील दोन वर्षांसाठी लागू असेल. म्हणजे दस्तांची अदलाबदल करण्यासाठी जी सवलत मिळत आहे ती पुढील दोन वर्ष मुदतीपर्यंत असेल.
सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा त्यासाठी जे काही मुद्रांक शुल्क व नोंदण शुल्क अगोदर भरले असेल, त्याचा परतावा मिळणार नाही.
या योजनेच्या सक्षम अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर विशेष मेळावे आयोजित करून सलोखा योजनेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सलोखा योजनेच्या माध्यमातून शासनाने कृषिक्षेत्रात क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. सलोखा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे मी आवाहन करतो. – डॉ. महेंद्र कल्याणकर, आयुक्त कोकण महसूल विभाग