महागाई एकदम ओक्के हाय…! देवपूजेचं सामानही GST कक्षेत ; अन्न धान्य, डाळी, दूध पदार्थ सहित कापूर, अगरबत्तीवरही 5% GST…
शेतीशिवार टीम : 8 जुलै 2022 :- धान्य, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, आटा अन्य शेतीमालावर 5% GST जीएसटी लावल्यानंतर आता देवपूजेचं सामान म्हणजे अगरबत्ती, कापूर, देव मुर्त्या GST कक्षेत आल्या आहेत. GST करप्रणाली लागू करताना केंद्र सरकारने रोज वापरात असणाऱ्या शेतीमालाच्या वस्तूंना या प्रणालीतून वगळण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, यामध्ये बदल करून सुरुवातीला रजिस्टर ब्रँडमध्ये विक्री होणाऱ्या वस्तूंवर जीएसटी लागू केला.
त्यावेळी ब्रँडमधील वस्तू समाजातील उच्चभ्रू लोक वापरतात, असे कारण दिले गेले. परंतु, आता ब्रँडऐवजी सर्वच प्रिपॅक आणि प्रि -लेबल खाद्यान्न वस्तुंवर 5% GST लावण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
मांस, मासे, दही, चीज आणि मध, चपला, छपाई, लेखन आणि रेखांकन शाई, विशिष्ट चाकू, चमचे आणि टेबलवेअर, डेअरी मशिनरी, एलईडी दिवे आणि ड्राइंग इंस्ट्रूमेंट सहित अगरबत्तीसारख्या वस्तूंवरही आता GST लागला आहे. आरोग्य विम्यावर देखील 18% GST लागू केला आहे.
या खाद्यान्नांवर 5% GST वस्तू आणि सेवा कर आकारण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आज शुक्रवारी आयोजन केले आहे.
एका बाजूला पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमालीचे वाढले आहेत, त्याचा परिणाम म्हणून रोजच्या प्रवास खर्चातही वाढ झाली आहे. महागाई निर्देशकांत वाढ झाली असल्याने बँकांचे व्याजदरही वाढत आहेत. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सामान्य ग्राहकांची फरफट होत आहे.
आज शुक्रवारी आयोजित केलेल्या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 125 असोसिएशनचे 175 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, महाराष्ट्र चेंबर आफ कॉमर्स इंडस्टीज ॲन्ड ॲग्रीकल्चर, फेडरेशन ऑफ असो. ऑफ महाराष्ट्र दि ग्रेन राईस अन्ड आईलसीडस मर्चंट्स असो. मुंबई, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्टीज ॲन्ड ट्रेड मुंबई, कॉन्फरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (महाराष्ट्र), ग्राहक पंचायत, दि पूना मर्चंट्स चेंबर व फेडरेशन ऑफ असो. ऑफ ट्रेडर्स महाराष्ट्र) असे प्रमुख 10 संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे .
अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, रायगड, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.