शेतीशिवार टीम : 13 ऑक्टोबर 2022 :- राज्य शासनाकडून राज्यातील जवळपास 50 ते 55 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झटका देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टरने) ऊस तोड केलेल्या ऊसाच्या वजनातून सरसकट 4.5% पाचटाचे वजन वजावट करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय घेऊन मान्यताही दिली आहे. त्यामुळे साखर हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-नोव्हेंबर) साठी हा नियम लागू होणार आहे.
या निर्णयाबाबत साखर आयुक्तालयाने दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी ऊस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास येणार्या पाचटाचे वजन निश्चित करण्याकरिता अभ्यास गट नेमून शासनास सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी अपर मुख्य सचिव (सहकार व पणन) यांच्या अध्यक्षतेखाली दि. 22 जुलै 2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत साखर आयुक्तलयाकडून अहवाल सादर करण्यात आला होता.
त्यामध्ये अभ्यास गट स्थापन करण्याचा उद्देश, निरिक्षण नोंदविलेले कारखाने, अभ्यास गटाने नोंदवलेली निरीक्षणे, निरीक्षणावर आधारित विश्लेषण व त्या आधारित शासनास केलेल्या शिफारशी यांची सविस्तर माहिती सादर केली.
सदर बाबींचा साकल्याने विचार करून ऊस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास येणाऱ्या पाचट वजावटीचे प्रमाण 4.5% इतके निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांका पासून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
परंतु, आता या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहे. शेतकरी संघटनांमधून या निर्णयाचा तीर्व विरोध केला जात आहे. हि वजावट शेतकरी आणि कारखानदारांमध्ये 50-50% विभागावी अशी मागणी शेतकरी संघटनाकडून करण्यात येत आहे. तसेच या हार्वेस्टरमुळे ऊस तोडणी मजुरांनाही धोका निर्माण झाला आहे.