देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक HDFC आणि फायनान्स कंपनी HDFC यांचे विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण 1 जुलैपासून लागू होणार आहे. गृहनिर्माण फायनान्स कंपनी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर अनेक गोष्टी बदलणार आहे.
खुद्द एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे . ते म्हणाले की, 30 जून रोजी एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेची बोर्ड बैठक होणार आहे. आणि 1 जुलैपासून, HDFC – HDFC बँकेचे विलीनीकरण प्रभावी होईल. या मेगा विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे खातेदार आणि एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांवर फारसा परिणाम दिसत नसला तरी ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
विलीनीकरणानंतर नेमका काय होणार बदल..
एचडीएफसी – एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर, एचडीएफसी लिमिटेडच्या सेवा एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध राहतील. तुम्हाला एकाच शाखेत कर्जापासून बँकिंग सेवांपर्यंत सर्व काही मिळणार आहे. बँकेच्या प्रत्येक शाखेतून गृहकर्ज दिले जाणार आहे. HDFC लिमिटेडच्या सेवा HDFC बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध राहतील. या विलीनीकरणानंतर ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. विलीनीकरणानंतर बँकेच्या भांडवलात पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होईल. भांडवल वाढवून बँक पूर्वीपेक्षा अधिक जोखमीचे कर्ज मिळू शकतं..
FD च्या व्याजदरात बदल..
ज्या ग्राहकांनी एचडीएफसी (HDFC) मध्ये एफडी केली आहे, त्यांचे व्याजदर बदलू शकतात. वास्तविक HDFC आणि HDFC बँकेच्या व्याजदरात तफावत आहे. एचडीएफसी हाऊसिंग फायनान्सच्या (Housing Development Finance Corporation) तुलनेत एचडीएफसी बँकेतील एफडी व्याजदर कमी आहेत.
उदाहरण म्हणून समजून घेऊ.
HDFC 12 ते 120 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 6.56 टक्के ते 7.21 टक्के व्याजदर देते. जर तुम्ही एचडीएफसी बँकेत एफडी केली तर तुम्हाला 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या एफडीवर 3 ते 7.25 टक्के व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी नूतनीकरणाचा पर्याय निवडला आहे, त्यांचे व्याजदर विलीनीकरणानंतर बदलतील.
एवढेच नाही तर विलीनीकरणानंतर एचडीएफसीच्या ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर विम्याचा लाभही मिळणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, बँक ठेवीदारांना ठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षणही प्रदान होणार आहे.
गृहकर्ज घेणाऱ्यांवरही परिणाम..
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी फायनान्सच्या विलीनीकरणामुळे एचडीएफसी फायनान्सच्या गृहकर्ज ग्राहकांवर परिणाम होईल. बँकेच्या विलीनीकरणानंतर, आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेची सर्व कर्जे एक्सटर्नल बेंच मार्क लेंडिंग रेट (EBLR) च्या आधारावर निश्चित केली जातात. दुसरीकडे, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी अशी कोणतीही आवश्यकता नाही.
विलीनीकरणानंतर एचडीएफसी लिमिटेडच्या ग्राहकांनाही आरबीआयचे नियम लागू होतील. या विलीनीकरणानंतर, पुढील सहा महिन्यांसाठी HDFC कर्जाचे व्याजदर बाह्य बेंचमार्क कर्ज दरावर आधारित असतील. विलीनीकरणानंतर, जेव्हा एचडीएफसी फायनान्स हा एचडीएफसी बँकेचा भाग होईल, तेव्हा त्याला हा नियम पाळावा लागेल आणि कर्ज EBLR शी लिंक करावे लागेल.
अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या कपातीचा लाभ ग्राहकांना लगेच मिळेल. रिझव्र्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर लगेचच ईबीएलआरशी लिंक नसलेल्या कर्जांना व्याज कपातीचा लाभ मिळत नाही. या विलीनीकरणानंतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
भागधारकांवर परिणाम..
या विलीनीकरणानंतर 13 जुलैपासून एचडीएफसीचा व्यवहार थांबणार आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांना बँकेत 41 टक्के हिस्सा मिळेल. एचडीएफसी लिमिटेडमध्ये असलेल्या प्रत्येक 25 शेअर्ससाठी एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स दिले जातील. म्हणजेच या विलीनीकरणाचा परिणाम भागधारकांवरही होणार आहे.
कर्मचाऱ्यांची छाटणी नाही..
एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले की, या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांची छाटणी होणार नाही. ते म्हणाले की, एचडीएफसी बँकेकडून 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कर्मचाऱ्यांना बँकेत सामावून घेण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यांच्या पगारातही कोणतीही कपात केली जाणार नाही.