IMD Alert | पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा !

0

महाअपडेट टीम, 19 जुलै 2021 :- गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. आज हवामान खात्याकडून (Meteorological department) मुंबईबरोबरच पाच जिल्ह्यात रेड अलर्ट (red alert) देण्यात आला आहे. तर चार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (orange alert) देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील 9 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोमवारी, 19 जुलै रोजी कोकणबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

शनिवारपासून पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरमध्ये चांगला पाऊस सुरू झाला आहे. रविवारी सकाळपर्यंत गगनबावडा येथे 120 मिमी, लोणावळा, महाबळेश्वर, इगतपुरी, ओझरखेडा, राधानगरीमध्ये 50, बार्सी, राहुरी, सांगोला येथे 40 मिमी पावसाची नोंद झाली.

सोमवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट (red alert) देण्यात आला आहे. याबरोबरच घाट परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरातील काही भागात पुढील चार दिवस मुसळधार आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.