आता प्रत्येक गावाच्या विकासाचा निर्देशांक ठरणार ! ग्रामपंचायतींना ‘या’ पोर्टलवर रजिस्ट्रेशनचे आदेश, आता ‘या’ पद्धतीने होणार गावाचा विकास..
केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकारचे विभाग, निती आयोग आणि पंचायती राज संस्थांचा समावेश असलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाच्या प्रक्रियेत पंचायत राज मंत्रालयाने नेतृत्वाची भूमिका घेऊन प्रत्येक गावचा पंचायत विकास निर्देशांक (पीडीआय) तयार करण्याचे निश्चित केल्याने गावे विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहेत, हे पाहून त्यांना विकासाचा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यापूर्वी विकासाचा निर्देशांक जिल्हापातळीपर्यंत पाहिला जायचा. आता गावपातळीवरचा सुद्धा विकास निर्देशांक पाहिला जाणार आहे. ग्रामपंचायतींच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी पंचायत विकास निर्देशांक हे एक बहुआयामी साधन असेल, निर्देशांक 2023 – 24 साठी 31 मार्च 2023 पर्यंतच्या उपलब्ध माहितीधारे पायाभूत व प्राथमिक अहवाल तयार केला जाणार आहे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचा पंचायत विकास निर्देशांक तयार केला जाणार असून, ग्रामपंचायतींनी पीडीआय पोर्टलवर रजिस्ट्रेशन Panchayat Development Index (PDI) Portal करायचे आहे. पीडीआय संकेतस्थळावर 2022, 23 या आर्थिक वर्षातील आधारभूत माहिती ऑनलाईन भरायची आहे.
प्रत्येक गावात कृषी, पशुसंवर्धन, सांख्यिकी, नियोजन, बँका, शिक्षण, वन, आरोग्य, गृह, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, महसूल, राष्ट्रीय ग्रामीण जवन्नोनती अभियान, महिला व बाल विकास, अशा 15 विभागांचा किती सहभाग आहे हे पाहिले जाईल. त्यात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह माहिती असेल. या माहितीवरून प्रत्येक ग्रामपंचायतीचे गुणांकन ठरेल.
गुणांकन 0 ते 40, 41 ते 60, 61 ते 75, 76 ते 90 व 90 असे असेल. या निर्देशांकावरून संबंधित गावास कोणती कामे, उपक्रम राबवायचे, शिवाय बलस्थानेही स्पष्ट करायची आहेत. ग्रामपंचायतींचा शाश्वत विकास स्थानिकीकरण संदर्भातील 2023 , 24 मध्ये तयार होणारा पंचायत विकास निर्देशांक हा पायाभूत माहिती म्हणून वापरला जाणार आहे.
निर्देशांकाच्या अंमलबजावणीस राज्य, जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावर प्रमाणिकरण व ग्रामपंचायत स्तर येथे अंमलबजावणी समिती स्थापन करून हे काम केले जाणार आहे.
जिल्हास्तरावर समिती
जिल्हास्तरावर माहितीचे सनियंत्रण प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. या समितीचे सचिव म्हणून जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) काम पाहतील. समितीत इतर 25 सदस्य असतील. तसेच जिल्हास्तरावर माहिती प्रमाणिकरण समितीही असेल. उपविभाग, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर देखील समित्या गठीत केल्या आहेत. माहिती संकलन नेमके कसे करायचे याचे निर्देश शासन निर्णयात दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात काम सुरू..
जिल्ह्यात पंचायत विकास निर्देशांकाचे गेल्या 5 फेब्रुवारीपासून काम सुरू झाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 साठी ग्रामपंचायतीच्या निवडी पंचायत विकास निर्देशांकातील माहितीवरून ठरतील यासाठी वेगळी प्रश्नावली ग्रामपंचायत मूल्यांकनासाठी वापरली जाणार नाही. निर्देशांक कामात प्रत्येक गावच्या ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची असेल.