यावर्षी नाफेडने खुल्या बाजार भावाने तूर खरेदी योजना चालू केली परंतु नोंदणी केलेला एकही शेतकरी केंद्रावर तूर विक्रीकरिता फिरकला नाही. नांदगाव केंद्रावर केवळ 24 शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरीता नोंदणी केली होती.
यावर्षी हगामात सुरुवातीपासूनच तुरीचे भावात तेजी कायम आहे बाजारात 10 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत तुरीला भाव मिळत आहे. नाफेडने यावर्षी खुल्या बाजारात तूर खरेदी योजना सुरू केली, परंतु खरेदी मधील अटी व शर्ती कायम असल्याने शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला नाही.
नाफेडला तूर विक्री करताना तुर एफएक्यू ग्रेडची असणे आवश्यक आहे, त्याकरता चाळणी करण्यात येते. चाळणीचा खर्च सुद्धा शेतकऱ्याकडून वसूल केला जातो. शिवाय विक्री केल्यावर चुकाऱ्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. सातबारावर तुर पेरणीची नोंद आवश्यक आहे. शिवाय यंत्रणेची मनधरणी करणे देखील करावी लागते.
उलट खुल्या बाजारात तुरीचा दर्जा पाहून सरसकट खरेदी केल्या जाते, ना चाळणीची गरज, ना सातबाराची उलट चुकारे सुद्धा तत्काळ मिळते. परिणामी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा केंद्रावर तुर विक्रीकरीता आणली नसल्याने या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरेदी केंद्र ओस पडल आहे.