परतीच्या पावसानं राज्यात मोठा हाहाकार उडाला होता.राज्यात शेतकऱ्यांचं या पावसामुळं खूप मोठं नुकसान झालं होतं. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर, कुठे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

एकीकडे अरबी समुद्रात तयार होणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळं राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता पुढच्या 24 तासांत वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. त्यामुळे या बातमीने शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे.

अरबी समुद्रतील बाष्पयुक्त वाऱ्यामुळं राज्यातील काही भागांतील थंडी गायब झाली आहे, याचा पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांची काढणीची लगबग सुरू असताना, येणाऱ्या पावसाच्या बातम्यांनी शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, या जिल्ह्यांसह कोकणात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता पुढच्या 24 तासांत वाढण्याची शक्यता असल्याने पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिणेकडील राज्यांमध्ये चार ते पाच दिवस पाऊस सुरू राहणार आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे, पुढील 4-5 दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटे, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा लवकरच तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातं पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे सावट आहे तर दुसरीकडे, मुंबईच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, येथे थंडी हळूहळू वाढत आहे. महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेमुळे गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे.

मुंबईत 17 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत मुंबईच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *