पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही सर्वाधिक लोकप्रिय बचत योजना आहे. खासकरून ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तीनंतरच्या गरजांसाठीही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात संपूर्ण रक्कम एकरकमी गुंतवावी लागते आणि मुदतपूर्तीनंतर, तुम्ही दर तिमाहीला निश्चित व्याजाचा लाभ घेण्यास पात्र ठरता. महत्वाचे म्हणजे या योजनेत पैसे 100% सुरक्षित राहतात. बाजारात कितीही चढ-उतार झाले तरी तुमच्या पैशावर या गोष्टींचा कोणताही परिणाम होत नाही.

5 लाखांच्या ठेवीवर 7.2 लाख डिपॉझिट

पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या योजनेवर, सरकारने 1 ऑक्टोबर 2022 पासून वार्षिक व्याज 7.6 टक्के इतके केले आहे. या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षे आहे. कंपाउंडिंग कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही एकरकमी 5 लाख रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर तुमचा एकूण फंड सुमारे 7.21 लाख रुपये असेल. येथे तुम्हाला व्याज म्हणून 2.21 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे, प्रत्येक तुम्हाला तिमाहीचे व्याज 11,058 रुपये असेल.

या योजनेत कोण उघडू शकतं खातं

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या योजनेत वार्षिक व्याज 7.6 टक्के असेल. यामध्ये 1000 रुपयांच्या पटीत ठेवी करता येतात. तसेच यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

SCSS या योजनेच्या अंतर्गत, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. जर एखाद्याचे वय 55 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल परंतु 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने VRS घेतले असेल तर तो देखील SCSS मध्ये खाते उघडू शकतो. परंतु त्यासाठी एक अट अशी आहे की त्याला सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत हे खाते उघडावे लागेल आणि त्यात जमा करावयाची रक्कम ही सेवानिवृत्तीच्या लाभाच्या रकमेपेक्षा जास्त नसली पाहिजे.

पती / पत्नी देखील उघडू शकतात एकत्र खाते

SCSS या योजनेच्या अंतर्गत, ठेवीदार त्याच्या किंवा तिच्या जोडीदारासह वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे एकापेक्षा जास्त खाती ठेवू शकतो. परंतु सर्व खाती मिळून गुंतवणुकीची कमाल मर्यादा १५ लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही. १ लाखापेक्षा कमी रकमेचे खाते रोखीने उघडता येते, मात्र त्यापेक्षा जास्त रकमेसाठी मात्र धनादेश वापराने अनिवार्य आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये खाते उघडताना आणि बंद करताना नामांकन सुविधा उपलब्ध आहे. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते. यामध्ये खातेधारक ही योजना मुदतपूर्व बंद करू शकतात. पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडल्याच्या 1 वर्षानंतर खाते बंद केल्यावर ठेवीतून फक्त 1.5% कपात करेल, तर 2 वर्षानंतर बंद केल्यावर ठेवीतील 1% कपात केली जाईल.

करतील सूट आणि दायित्व जाणून घ्या :-

SCSS खात्यातील ठेवींमुळे तुम्हाला कर कपातीचाही फायदा होतो. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता. तथापि, SCSS मधील व्याज मात्र करपात्र आहे.

जर तुमच्या सर्व SCSS चे व्याज उत्पन्न वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमचा TDS कापला जाऊ शकतो. या कराची रक्कम तुमच्या व्याजातून वजा केली जाते. जर व्याज विहित मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर तुम्ही फॉर्म 15G/15H सबमिट करून TDS मधून सूट मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *