देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाही आम्हाला पायाभूत सुविधा मिळत नाहीत. मग महाराष्ट्रात राहून काय उपयोग? आपल्या गावांचा कर्नाटकात समावेश झाला तर काय चुकीचे होईल? अशी भूमिका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सेगाव तर अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी, कुमठे, केगाव बुद्रुक, केगाव खुर्द, चिंचोलीनजीक, सुलेरजवळगे, तळवळ, शेगाव, धारसंग, आळगे, गुड्डेवाडी, अंकलगे, खानापूर, म्हैसलगी, हिळळी, पानमंगळूर, करजगी ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त करणारे व्हिडीओ तयार करून ते सर्वत्र व्हायरल केले आहेत .
शिवाय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष देखील केला आहे. कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक गावाच्या सरपंचाने त्यांच्या लेटरपॅडवर निवेदन तयार करून ठेवावे. लवकरच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ते देऊ, अशा प्रकारचे आवाहन व्हिडीओद्वारे करण्यात येत आहे.
आपल्या भागाचा विकास झालेला नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहोत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्याच्या मूलभूत सुविधा सुद्धा पूर्ण क्षमतेने अद्याप मिळत नाहीत. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे लोटली. अद्याप अनेक गावात एसटी बस पोहोचलेली नाही.
सुरू असलेल्या अनेक एसटी बस बंद आहेत. कॅनॉलचे पाणी आणण्याच्या केवळ अनेक वर्षांपासून वल्गना केल्या जात आहेत. असे असताना महाराष्ट्रात कशासाठी राहायचे? असा प्रश्न सीमावर्ती भागातील ग्रामस्थांनी व्यक्त कला आहे.
सहमती पत्रे गोळा करण्याचे काम :-
राजकीय लोक केवळ आश्वासन देत आहेत. आतापर्यंत आमच्या भागाला मूलभूत सेवासुविधा मिळाल्या नाहीत. रस्त्याची दयनीय अवस्था आहे . तत्काळ सोयीसुविधा द्या, अन्यथा 20 हून अधिक गावे कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. अशा प्रकारचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. संबंधितांकडून निवेदने घेत आहोत.
कर्नाटकचे कलेक्टर आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. ग्रामसभा घेऊन सहमती पत्रे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे, असे अक्कलकोट तालुक्यातील आळगेचे सरपंच महादेव हतुरे यांनी सांगितले.