कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग : ‘या’ शेतकऱ्यांना संपादीत जमीनींपोटी 49 लाख 84 हजार रुपयांचा मिळाला मोबदला…

0

शेतीशिवार टीम : 20 सप्टेंबर 2022 :- पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत झालेल्या सात गावांपैकी देवराई आणि निवडुंगे या गावातील ५ शेतकऱ्यांच्या जमीनीना ४९ लाख८४ हजार १३० रुपयांचा दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ पासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यात यश आले असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्र.222 कल्याण विशाखापट्टणम हा मार्ग पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी,देवराई,माळीबाभूळगाव निवडूंगे,शेकटे,वाळूंज करंजी या सात गावांमधून जात आहे. यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने 27 शेतकऱ्यांचे एकूण 15 हजार 728 चौ.मी.क्षेत्र संपादीत केले होते.जमीनीचे संपादन झाले तरी शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळालेला नव्हता.

या मोबदल्याचा प्रश्न 2017 पासून प्रलंबित राहीला होता.यासंदर्भात खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यांनतर दुसऱ्या टप्प्यातील 5 शेतकऱ्यांना त्यांच्या संपादीत झालेल्या जमीनींचा मोबदला मिळण्यातील अडचणी दूर झाल्या असून देवराई गावातली चार आणि निवडुंगे गावातली एक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 49 लाख 84 हजार 130 रूपये जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास रक्कम त्वरित जमा होणार असल्याचे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

कल्याण विशाखापट्टणम या महत्वपूर्ण महामार्ग नगर जिल्ह्य़ातून जात असून भुतेटाकळी ते मेहेकरी इतक्या 52 किमी लांबीचे हे अंतर आहे.यापैकी बरेच अंतर पाथर्डी तालुक्यातील सात गावांमधील असल्याने या गावातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचा मोठा लाभ या गावांना होईल असा विश्वास खा.डॉ विखे यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने या रस्तांची काम वेगाने पुढे जात आहेत.रस्ते विकासाचा मोठा लाभ नगर जिल्ह्याच्या दळणवळणासाठी होणार असून उद्योग तसेच व्यापारी क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.