मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी लढा उभारल्यानंतर शासनाने कुणबीच्या नोंदीचा शोध घेतला आहे. नगर, धुळे, पुणे, जळगाव, सोलापूर, बीड, कोल्हापूर, जालना या जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या असून मराठवाड्यातील सर्वाधिक कुणबी नोंदी बीड जिल्ह्यात सापडलेल्या असून आता कुणबी प्रमाणपत्र काढण्यातही बीड जिल्हा अव्वल आहे. सद्यस्थितीत प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वत्र धावपळ सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला आहे. त्यांच्या परिश्रमामुळे आणि मराठा समाजाचा रेटा लक्षात घेवून सरकारने राज्यातील कुबणीच्या नोंदीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. शिवाय कुणबी मराठा, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती.
यानंतर मराठवाड्यातील कुणबी नोंदीचा शोध घण्यात आला. यात मराठवाड्यात 26,624 नोंदी आढळून आलेल्या असून यातील 13,128 नोंदी बीडमधील असल्याचे समोर आले आहे. नोंदी सापडल्यानंतर मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ सुरू केली असून आतापर्यंत मराठवाड्यात 1658 प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. यात 506 हे बीड जिल्ह्यातील आहेत.
वंशावळ शोधताना दमछाक..
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळ काढवी लागते. ही वंशावळ काढताना मराठा बांधवांची दमछाक होत आहे. दरम्यान, सद्यस्थितीत वंशावळ काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून येणाऱ्या काही दिवसात कुणबी प्रमाणपत्राची संख्या वाढणार आहे. भावकीत वंशावळ जुळली की सर्वांना फायदा होणार आहे.
कुणबी अर्जासोबत ही आहेत आवश्यक कागदपत्रे..
100 रुपयांच्या बॉण्डवर वंशावळ प्रतिज्ञा पत्र (वडिल, आजोबा, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार..
अर्ज करणारा व लाभार्थींचे टिसी, आधार कार्ड
अर्जदाराचा रहिवासी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
– जन्म- मृत्यू नोंदीचा 1967 पूर्वीचा पुरावा – (यामध्ये खासरा पत्र, पाहणी पत्र, कुळ नोंद वही, नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना न. 1 हक्कनोंद पत्रक, सातबारा उतारा, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम नोंद वही इत्यादी..
– कुटुंबातील व्यक्तीचे जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र असेल तर द्यावे..
अर्ज कुठे आणि कसा कराल ?, दाखला किती दिवसांत मिळणार..
सेतू किंवा महा-ई – सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे करावा अर्ज.
अर्ज करताना जात प्रमाणपत्रासाठी द्यावे लागेल 53 रुपयांचे शासकीय शुल्क
अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत दाखला देणे बंधनकारक
अर्जातील त्रुटींची माहिती अर्जदाराला मोबाईलवर समजणार आहे.
प्रमाणपत्रात बीड तालुका ‘टॉप’ 1 वर. .
1) बीड जिल्ह्यात 594 मराठा बांधवांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केले असून यातील 506 जणांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. यात 88 अर्जात त्रुटी आढळून आलेल्या आहेत.
2) कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या तालुक्यांमध्ये बीड, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, याच तालुक्यांचा समावेश असून यात बीड टॉपवर आहे. 358 जणांनी अर्ज केल्यानंतर 341 प्रमाणपत्र वाटले आहेत.
3) तर गेवराई, शिरूर, आष्टी, केज, धारूर, वडवणी या तालूक्यात अद्यापपर्यंत अर्ज दाखल झालेले नाहीत. याठिकाणी प्रमाणपत्र काढण्यासाठी अजूनही जनजागृती झालेली नाही. हे काम मराठा तरुणांना करावा लागणार आहे.
4) परळी तालुक्यात कुणबी प्रमाणपत्र शोधण्यात प्रशासनाने उशीरा सुरुवात केल्याचे बोलले जात होते. तर याठिकाणी 8 जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले होते. यातील सर्वच्या सर्व नाकारण्यात आले आहेत.
कुणबी प्रमापत्र काढण्यासाठी मोजके कागदपत्रे लागतात. मात्र हे काम एकाने करण्यासाठी भावकीने एकत्रित येऊन केले तर कागदपत्रे जमविण्यासाठी कमी वेळ आणि कमी खर्चही लागेल. शिवाय सर्वांना एकत्रित फायदा होण्यास मदत होईल. आपण मोर्चासाठी एकत्रित येतो, आता प्रमाणपत्र काढण्यासाठी एकी दाखविणे आवश्यक आहे. – राहुल वायकर, मराठा आंदोलक, बीड