Land Buy-Sale : आता जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरु आहे की नाही? हे घरबसल्या कळणार, या वेबसाईटवर टाका सर्व्हे नंबर..
जमिनीसंदर्भात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे की नाही, याची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तसेच ‘इक्यूजेसी’ या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या संकेतस्थळावर नागरिकांनी जमिनीचा सर्वे नंबर टाकल्यास या जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे की नाही, याची माहिती होईल. या सुविधेमुळे जमिनीची खरेदी – विक्री करताना होणारी नागरिकांची फसवणूक टळणार आहे. (Land Buy-Sale)
सर्वच भागात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीला चांगला भाव मिळत असल्याने अनेक जमिनींबाबत वाद सुरू आहेत. जमीन खरेदी करतेवेळी या जमिनीच्या दाव्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे दस्तनोंदणी झाल्यानंतर जमिनीमध्ये वादविवाद असल्याचे लक्षात येते. तोपर्यंत खरेदी व्यवहार पूर्ण झालेला असतो. पैसेसुद्धा दिलेले असतात. अशा प्रकरणांमध्ये खर दीदाराची फसवणूक होते.
जमिनीची खरेदी विक्री करताना सर्च रिपोर्ट घेतला जातो. परंतु अनेकदा त्यामध्ये जमिनीवरील न्यायालयीन वाद सुरू असल्याचे दिसून येत नाही. तसेच सातबारा उतारा अथवा फेरफार उताऱ्यावर न्यायालयीन वाद सुरू असल्याची कुठेही नोंद नसते. त्यातून खरेदीदाराची फसवणूक होते. तसेच नव्याने न्यायालयीन वाद निर्माण होतात. गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने महसूल व दिवाणी न्यायालयातील जमिनीविषयक दावे सर्व्हे नंबर निहाय लिंक करण्याची योजना आखली आहे. महाभूमी या संकेतस्थळावर तसेच ‘eqjcourts’ या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
संकेतस्थळावर विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडावे लागणार आहे. गाव निवडल्यानंतर सर्व्हेनंबर टाकल्यानंतर त्या जमिनीसंबंधी काणला न्यायालयात दावे सुरू आहेत की नाहीत, याची माहिती मिळणार आहे.
व्हेबसाइट – eqjcourts.gov.in