शेतीशिवार टीम, 4 फेब्रुवारी 2022 : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली असून, शाळा आणि महाविद्यालये पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांबाबत (Maharashtra Board Exam 2022) गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. गाईडलाईन्सनुसार, महाराष्ट्रात 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहेत.
10वीची परीक्षा होणार15 मार्चपासून सुरू…
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या गाईडलाईन्स जारी केल्या असून, गाईडलाईन्स नुसार महाराष्ट्रात 10वीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार असून ती 4 एप्रिल रोजी संपणार आहे. त्या – आधी 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
12 वीची परीक्षा होणार 4 मार्चपासून सुरू…
दुसरीकडे 12वीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.
परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली चार पटीने…
गाईडलाईन्सनुसार विद्यार्थ्यांना लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. एका वर्गात 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांना कोरोना सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सामावून घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या जवळपास 4 पट वाढवण्यात आली आहे.
ऑफलाइन परीक्षेला सुरू होता विरोध…
याआधी महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन करण्याची मागणी होत होती, त्यासाठी आंदोलने झाली होती. मात्र आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.