राज्यातले नवे सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुहूर्त काही सापडलेला नाही असेच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशिरा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राशी संबंधित अनेक विषयांवर त्यात चर्चा झाली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जानेवारी अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार करायला हरकत नसल्याचे अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते. या मंत्रिमंडळ विस्तारात 20 नव्या चेहऱ्याचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यात भाजपच्या दहा, तर एकनाथ शिंदे गटाला 2 तर 2 अपक्ष आमदारांना कॅबिनेट दर्जाची मंत्रीपदे देण्याची रणनीती आखण्यात येणार आहे.
या मंत्रिमंडळात 7 राज्यमंत्र्यांचाही समावेश करण्याचा विचार असून त्यामध्ये भाजपचे चार आणि बंडखोर गटाच्या तिघांची वर्णी लागू शकते. असे असले तरी 26 जानेवारीपूर्वी विस्ताराचा मुहूर्त निघेल की नाही याबाबत साशंकता आहे.
शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात 1 जुलै रोजी स्थापन झाल्यांनतर तब्बल 40 दिवस मंत्रिमंडळाविना काम करत होते. त्यानंतर 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला. यातही मोजक्याच मंत्र्यांवर अनेक खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती त्यातच मंत्रिमंडळात राज्यमंत्री नसल्याने मंत्र्यांवर अधिवेशन काळात कामाचा मोठा ताण येत आहे.
सध्या पालकमंत्री म्हणूनही एका मंत्र्यांकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक जिल्हे आहेत फडणवीसांकडे तर तब्बल 6 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे. त्याचा ताण जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेवर येतो आहे. तसेच सरकार स्थापन झाल्यापासून अनेक आमदारही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यांचीही निराशा वाढत आहे.
जानेवारीत महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर हे सगळेच प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत त्यात आणखी 20 मंत्र्यांची भर पडली तर जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधकांकडून होत आहे टीका :-
दरम्यान अमित शाह आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीवर टीका करताना विरोधक आक्रमक दिसत होते. कर्नाटकने उकरून काढलेल्या सीमावादावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर गृहमंत्र्यांसोबत झालेल्या 15 मिनिटाच्या बैठकीत अश्या काय महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली हा प्रश्न देखील विरोधकांकडून विचारण्यात आला.