जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियामधून भारतात तब्बल 51 हजार मेट्रिक टन कापसाची आयात करणार असल्याची बातमी सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अन् जर या 51 हजार मेट्रिक टन कापसाची आयात होणार असेल तर कापसाचे भाव कसे राहतील ? या आयातीमुळे नेमका शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावावर काय परिणाम होईल ? या संदर्भात सविस्तर माहिती आपण शेतीशिवारच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत..
तस पाहिलं तर जगामधील कापसाच्या उत्पादनात भारत देश अग्रेसर देश आहे जवळजवळ 25 ते 30% उत्पादन कापसाचं हे आपल्या भारत देशामध्ये घेतलं जातं. भारत देशाच्या अंतर्गतही आपलं राज्य सुद्धा अग्रेसर राज्य आहे.
परंतु, 2022 मध्ये जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा झालेला खंड, तसेच सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे कापसाच्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर येणारं उत्पादन खालावलेलं आहे.
तसेच मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल, देशांतर्गत वाढत असलेले टेक्स्टाईल उद्योग इ. प्रक्रिया उद्योगांना लागणार कापूस आणि मिळणार रॉ मटेरियल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून टेक्सटाइल इंडस्ट्री युनियन सुद्धा केंद्र शासनाकडे वारंवार इम्पोर्ट ड्युटी कमी करून कापसाची आयात करण्यासाठी परवानगी मागितली होती.
आता ही मागणी मान्य केली असून 11% इम्पोर्ट ड्युटी माफ करून ऑस्ट्रेलियातुन 51 हजार मेट्रिक टन कापसाची आयात करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून परवानगी दिली आहे. डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत 492 मेट्रिक टन कापूस आयातही केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
आता आपण आपल्या राज्यातील कापसाबद्दल जाणून घेऊया..
एकंदरीत महाराष्ट्रातील कापसाचे घटलेलं उत्पादन आणि वाढलेल्या मागणीमुळे कापसाला 10 हजारांच्या पुढे भाव मिळणं अपेक्षित होतं. परंतु, या कापूस इम्पोर्ट करण्याच्या बातमीमुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात घाबरला जातो अन् कापूस पडत्या दारांत विकायला काढतो त्यामुळे अवाक वाढल्याने भाव आणखी पडतात.
परंतु, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यात कापसाचे होणारे उत्पादन अन् मार्केटमध्ये येणारा कापूस या सर्वांच्या बेसवर कापसाचे भाव 9 हजाराच्या पुढे जाण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण निर्माण झालं आहे.
परंतु, 51 हजार मेट्रिक टन कापसाची आयात होणार आहे, त्यामुळे भाव पडणार का ?
ऑस्ट्रेलिया हा भारतापेक्षा कमी कापसाचे उत्पादन घेणारा देश आहे, केंद्र सरकारने जरीआयात करण्यास परवानगी दिली असली तरी ऑस्ट्रेलियाला 51 हजार मेट्रिक टन कापूस निर्यात करणं हे सहजासहजी शक्य आहे का ? तर त्याच उत्तर नाही असच आहे, कारण ऑस्ट्रेलियात असलेल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीजही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनाच इंडस्ट्रीजसाठी इतर देशातून कापूस आयात करावा लागतो त्यामुळे इतका मोठा कापूस निर्यात करणं ऑस्ट्रेलियाला परवडणार नाही.
परंतु या बातमीचं भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसवून बाजार भाव पाडण्यासाठी दलाल मोठ्या प्रमाणात काम करत असतात. त्यामुळे या बातमीच्या कुठल्याही दडपणाखाली शेतकऱ्यांनी न येता आपल्या कापसाची टप्प्याटप्याने विक्री केली तर कापसाला नऊ हजार पेक्षा जास्त आणि दहा हजारापर्यंत भाव सहजरित्या मिळू शकतो.
हंगाम संपल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारी अखेरपर्यंत हा भाव 11 हजारापर्यंत जाण्याची शक्यताही जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्यांना घाबरून न जाता आपला कापूस जसा शक्य होईल तसा मार्केटमध्ये विका आणि चांगल्या भावाने कापूस विका कुठल्याही अफवेला बळी पडू नका..
सध्या राज्यात काय आहे कापूस बाजारभाव :-
राज्यात सध्या कापूस बाजारभाव हा 7500 ते 8500 पर्यंत आहे.
राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 3) कापसाच्या 3000 क्विंटल आवक झाली. कापसाला प्रतिक्विंटल सर्वाधिक किमान 8370 ते कमाल 8720 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.