राज्यात यंदा अतिवृष्टी, सततचा पाऊस, परतीच्या पावसाने थैमान घातल्याने सोयाबीनसाहित कापसाचे उत्पादन घटलं आहे.भोकरदन तालुका हा कापूस उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. नगदी पीक म्हणून तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करतात. यंदा मात्र कपाशीच्या भावात अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात पहिल्या वेचणीपासूनचा हजारो क्विंटल कापूस पडून असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

अनेक शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकत आहेत. सुरुवातीला 9500 रूपये प्रतिक्विटल दराने विकल्या जाणाऱ्या कापसाला बाजारात सध्या 7500 ते 8500 रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

भोकरदन तालुक्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहल्याने शेतकऱ्यांनी जवळजवळ एक लाख तीन हजार हेक्टर क्षेत्रावर मोठा खर्च करुन खरिपाची पेरणी केली.

यात 42 हजार 300 हेक्टरवर कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. कपाशीच्या पिकाला ऐन पाते व बोंडे लागण्याच्या काळातच पाऊस सुरू राहल्याने पाते व फुल गळण्याचे प्रकार घडले, बोंडअळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी औषधी फवारणीवर आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र परतीच्या पावसाने देखील पाऊस घरात येण्याच्या काळातच थैमान घातल्याने कापसाचे उत्पादन घटले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी परजिल्यातील मजूर आणून दहा रुपये किलो मजुरी देऊन कापूस वेचून घरी आणला.

कपाशीवर लावलेला खर्च कापूस भाववाढीतून मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. दिवाळीपासून कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आज घडीला कापसाचे भाव प्रति क्विंटल 4,200 रुपये आहे मागील दिवसात कापसाला 9000 ते 9500 रुपयापर्यंत भाव मिळाला होता.

परंतु त्यानंतर कापसाच्या दरात घसरणच होत गेली आहे. व्यापारी देखील वरच बाजार पडेल असल्याचे सांगत पडलेल्या भावात कापसाची खरेदी करीत आहे. मात्र, अनेक शेतकरी आजही भाववाढीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र भाव वाढ होत नसल्याने कापसाच्या वजनात देखील फरक पडणार आहे. शिवाय अधिक काळ झाला तर कापसात पिसा देखील होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे, ते शेतकरी आता अडचणीत आले आहेत.

पहा, आजचे कापूस बाजारभाव..

आज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीत 691 क्विंटल कापसाची अवाक झाली असून जास्तीत जास्त 8000 पर्यंत दर मिळाला आहे.

आज नागपूर सावनेर बाजार समितीत 2750 क्विंटल कापसाची अवाक झाली असून जास्तीत जास्त 7650 पर्यंत दर मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यातील मनवात बाजार समितीत 3600 क्विंटल कापसाची अवाक झाली असून जास्तीत जास्त 7860 पर्यंत दर मिळाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव बाजार समितीत 2000 क्विंटल कापसाची अवाक झाली असून जास्तीत जास्त 7800 पर्यंत दर मिळाला आहे.

आज वर्धा बाजार समितीत 550 क्विंटल कापसाची अवाक झाली असून जास्तीत जास्त 7900 पर्यंत दर मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *